तीन वेळा अपयशी राहिला दरोडा
By admin | Published: October 10, 2016 12:22 AM2016-10-10T00:22:50+5:302016-10-10T00:22:50+5:30
आमगावच्या ठाणा येथे ५ आॅक्टोबर रोजी दरोडा घालणाऱ्या आरोपींनी त्या कर्मचाऱ्यांना लुटण्याचा माणस
गोंदिया: आमगावच्या ठाणा येथे ५ आॅक्टोबर रोजी दरोडा घालणाऱ्या आरोपींनी त्या कर्मचाऱ्यांना लुटण्याचा माणस बांधला होता. त्याच कंपनीच्या जून्या कर्मचाऱ्यांनी या दरोड्याचा कट रचला. या घटनेपूर्वी मागील वर्षभरात तीन वेळा दरोडा करण्याचा प्लान केला गेला. परंतु तो प्लान अपयशी राहीला, मात्र चवथ्यावेळी त्यांना यश आलेय परंतु एक चूक त्यांना तुरूंगात टाकण्यास पुरेशी ठरली.
नागपूरच्या लॉजीकॅश कंपनीला एटीएममध्ये रक्कम टाकण्याचे कंत्राट दिले होते. या कंपनीचा कर्मचारी म्हणून या गुन्ह्याचा मुख्यसुत्रधार चंद्रुकमार उर्फ पिंटू विजय शहारे (३१) हा होता. कंपनी त्याच्याकडे रोख रक्कम एटीएममध्ये टाकण्यासाठी दिल्यावर तो प्रत्येकवेळी कमी रक्कम एटीएममध्ये टाकायचा. कधी १० हजार तर कधी १५ हजार अशी रक्कम कमी टाकायचा. असे त्याने ३ लाख रूपये एटीएम मध्ये कमी टाकले. त्यावर कंपनीने त्याला कारवाई करण्याची धमकी दिल्यामुळे त्याने दिड लाख रूपये भरले. परंतु दिड लाख न दिल्याने कंपनीने त्याला कामावरून कमी केले. याचा वचपा काढण्यासाठी एटीएममध्ये कॅश टाकणाऱ्यांना लुटण्याचा त्याने चंग बांधला.
ही गोष्ट त्याने काही लोकांकडे बोलूनही दाखविली होते. त्याने मागील वर्षभरात तीन वेळा दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु तिन्ही वेळा दरोडा घालता आला नाही. चवथ्या वेळी त्यांना यश आले व ठाणा येथे दोन तरूणांना लुटून त्यांच्या जवळून २६ लाख नेण्यात आले. या प्रकरणातील २४ लाख २४ हजार रूपये पोलिसांनी जप्त केले आहेत. तर एक लाख ७६ हजार रूपये आरोपींनी खर्च केले आहेत. सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, सचिन सांडभोर, हवालदार राजेश बढे, लिलेंद्र बैस, अर्जुन कावळे, संतोष काळे, रामलाल सार्वे, कवलपालसिंह भाटीया, अजय सव्वालाखे, विनय शेंडे, राजकुमार खोटेले, रेखलाल गौतम, तुलसीदास लुटे, धनंजय शेंडे, जयप्रकाश शहारे, शैलेश अंबुले, नितीन जाधव, भुमेश्वर जगनाडे, चालक सोहनलाल लांजेवार यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
१४ पर्यंत पीसीआर
४या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींना न्यायालयाने १४ आॅक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ४८ तासात सात आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्याची मोहीम सुरूच आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढणार आहे.
दोन मोटारसायकल जप्त
४अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्हा करताना वापरलेल्या दोन मोटारसायकलचा वापर केला. त्या वाहनांना क्रमांक होते, परंतु गुन्हा करतेवेळी त्यांनी त्या वाहनांच्या नंबर प्लेट उलट्या लावल्याने विना क्रमांच्या मोटारसायकल होत्या असे तक्रारकर्त्यांना वाटले.