तीन पटीने वाढले अपहरण
By admin | Published: December 28, 2015 01:54 AM2015-12-28T01:54:42+5:302015-12-28T01:54:42+5:30
कधी शांततेचे शहर म्हणून ओळख असलेल्या गोंदियात आता महिलांसंबंधी हिंसक घटना घडत असल्याने महिला व मुलींना असुरक्षित वाटत आहे.
वर्षभरात ७० गुन्हे दाखल : अतिप्रसंगाच्या ५१ घटना, अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश
गोंदिया : कधी शांततेचे शहर म्हणून ओळख असलेल्या गोंदियात आता महिलांसंबंधी हिंसक घटना घडत असल्याने महिला व मुलींना असुरक्षित वाटत आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अपरणाच्या घटनांत तीन पटीने वाढ झाली आहे. अतिप्रसंगाचे ५१ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तर छेडछाडच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या काळात अपहरणाची ७० प्रकरणे दाखल झाली. मागच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत अपहरणाचे २२ प्रकरण दाखल करण्यात आले. मागील वर्षभरात २६ प्रकरण दाखल करण्यात आले होते. अतिप्रसंगाच्या घटनांचे थोडे कमी प्रमाण आहे. परंतु छेडखानीच्या घटनांत वाढ झाली आहे. या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत अतिप्रसंगाचे ५१ प्रकरण दाखल करण्यात आले. मागील वर्षी हा आकडा ५३ होता. मागील वर्षी डिसेंबर अखेर ५८ प्रकरण दाखल करण्यात आले होते.
महिला व तरूणींच्या सोबत छेडछाडीची १११ प्रकरणे दाखल करण्यात आली. मागील वर्षीच्या अकरा महिन्यात १०६ प्रकरण दाखल केले होते. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ११३ प्रकरण दाखल करण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत महिला व तरूणींचे अतिप्रसंग व छेडछाडीच्या १८ घटना नमूद आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांनी महिलांवरील होणाऱ्या अत्याचारावर आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)