विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षांचा सश्रम कारावास
By admin | Published: June 10, 2017 02:12 AM2017-06-10T02:12:19+5:302017-06-10T02:12:19+5:30
कपडे धुण्यासाठी जात असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या ...
मुरपार येथील प्रकरण : पाच साक्षीदार तपासले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कपडे धुण्यासाठी जात असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या गावातीलच तरूणाला जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला आहे. सदर निकाल गुरूवारी (दि.८) सुनावण्यात आला आहे.
सविस्तर असे की, देवरी तालुक्यातील मुरपार हे गाव सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येते. गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी १२ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी कपडे धुण्यासाठी नदीवर जात होती. तिला गावातीलच आरोपी सुखदेव रघुनाथ शेंडे (२७) याने रस्त्यात अडविले व तिचा विनयभंग केला. प्रकरणी सालेकसा पोलिसांनी भादंवीच्या कलम ३५४ (अ) व बाल लैंगिक अत्याचार प्रतीबंधक अधिनीयम कलम ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी देवीदास इलमकर यांनी केला होता.
या संदर्भात सरकारी वकील वसंत चुटे यांनी न्यायालयात पाच साक्षदार तपासले. प्रकरणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी आरोपीला कलम १२ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची अधीक शिक्षा सुनावली आहे.
तर कलम ३५४ अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची अधीक शिक्षा सुनावली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी सीएमएस सेलचे राजकुमार कराडे यांनी काम बघितले.