नाल्यात वाहून गेले तीन तरुण, आंघोळीसाठी उतरले होते, देवरी पोलीस घटनास्थळी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 02:58 PM2020-09-23T14:58:14+5:302020-09-23T14:58:48+5:30
सावन सिताराम पटले (२२), अतुल माणिकचंद ठाकूर (१६) व संदीप सोमराज कटरे (२२) रा.धोबीसराड असे नाल्यात वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत.
गोंदिया : देवरी तालुक्यातील धोबीसराड नाल्यात आंघोळीसाठी गेलेले तीन तरुण वाहून गेल्याची घटना बुधवारी (दि.२३) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या तीन तरुणाचा शोध आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने घेतला जात आहे. सावन सिताराम पटले (२२), अतुल माणिकचंद ठाकूर (१६) व संदीप सोमराज कटरे (२२) रा.धोबीसराड असे नाल्यात वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार बुधवारी सकाळी धोबीसराड येथील पाच मुले गुरांसाठी चारा आणायला जंगल परिसरात गेले होते. मंगळवारी झालेल्या पावासामुळे नदी, नाले, ओढे हे भरून वाहत आहेत. चारा आणताना नाला गावाजवळूनच वाहत असल्याचे पाहून त्या तरूणांना आंघोळीचा मोह आवरता आला नाही. पाचही तरूण आंघोळीसाठी नाल्यात उतरले असता आंघोळ करीत असताना अचानक पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले.
या घटनेची माहिती दोन तरुणांनी गावकऱ्यांना दिली. त्यानंतर गावक-यांनी नाल्याकडे धाव घेतली. तसेच याची माहिती देवरी पोलिसांना दिली. देवरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल झाले. वाहून गेलेल्या तरुणांचा शोध अजून लागला नव्हता.