तीन दिवसांपासून रूग्णांसह कर्मचारी तहानलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 09:05 PM2017-09-07T21:05:03+5:302017-09-07T21:05:32+5:30
विविध कारणांवरुन नेहमीच चर्चेच राहणारे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून पाणीच मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विविध कारणांवरुन नेहमीच चर्चेच राहणारे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात गेल्या तीन दिवसांपासून पाणीच मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालय प्रशासनाने तीन दिवसांचा कालावधी लोटूनही पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था न केल्याने रुग्णांसह येथील कर्मचाºयांना त्याचा फटका बसत आहे.
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणी विभागाजवळील बोअरवेलवर मोटारपंप लावून रुग्णालयाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र तीन दिवसांपूर्वी मोटारपंप जळाला त्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे. याच मोटारपंपाचे पाणी टाकीत साठवून त्याचा उपयोग प्रयोगशाळा, पोषाहार पुनर्वसन कक्ष, बालरोग विभाग व ओपीडीमध्येसुद्धा केला जातो. मागील तीन दिवसांपासून पाणी मिळत नसल्यामुळे सदर चारही विभागातील कर्मचारी, रूग्ण व त्यांच्या नातलगांना हात धुणे व पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णालयाबाहेर भटकंती करावी लागत आहे. तर शौचालयासाठी देखीेल पाणी पुरवठा केला जात नसल्याने येथे प्रसुतीसाठी येणाºया महिला आणि रुग्णांचे हाल होत आहेत. पोषाहार पुनर्वसन केंद्रात नर्सिंग कॉलेजमधून पिण्यासाठी पाणी आणूण काम चालवावे लागत आहे. रूग्णालयात पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाण्याचा पुरवठा होतो.
त्या पाण्याचा उपयोग रूग्णालयातील रूग्णांसाठी भोजन बनविणे व उर्वरित वार्डात पिण्यासाठी केला जातो. इतर विभागांपर्यंत पाणी पोहोचविण्यात आले तर पाण्याची मोठीच कमतरता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोटारपंप दुरूस्तीची जबाबदारी कुणाची
मागील तीन दिवसांपासून मोटारपंप बंद असून त्याची त्वरीत दुरूस्ती करणे रुग्णालय प्रशासनाकडून अपेक्षीत होते. मात्र त्यांनी अद्यापही याची दखल घेतलेली नाही. बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचे स्थानांतरण झाले आहे. पण, सदर अधिकाºयांने आतापर्यंत पदभार सोडला नाही. सदर अधिकारी सध्या रजेवर आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या कशी सुटणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोषाहार पुनर्वसन केंद्रात पाणी नसल्यामुळे मी स्वत: पुढाकार घेऊन बांधकाम विभागाकडे निवेदन दिले. परंतु आता काही कर्मचारी पाठवून दुरूस्तीसाठी मोटारशी जोडलेला काही भाग घेवून गेले आहेत. परंतु पाण्याची समस्या कधी दूर होईल, हे सांगता येत नाही. सध्या पिण्यासाठीच नव्हे तर हात धुण्यासाठीसुद्धा पाणी उपलब्ध नाही.
-डॉ.के.के.त्रिपाठी
प्रभारी अधिकारी, पोषाहार पुनर्वसन केंद्र, बीजीडब्ल्यू रूग्णालय, गोंदिया