गोंदिया : बुधवारपर्यंत वादळवारा, ढग व पावसाचा अंदाज, पारा आला २९.८ अंशावर, वातावरण झाले कूल
By कपिल केकत | Published: May 4, 2023 06:15 PM2023-05-04T18:15:04+5:302023-05-04T18:15:16+5:30
जिल्ह्यात अवकाळी पाऊस ठाण मांडून बसला असून दररोज वेगवेगळ्या भागात तो हजेरी लावत आहे.
गोंदिया : जिल्ह्यात अवकाळी पाऊस ठाण मांडून बसला असून दररोज वेगवेगळ्या भागात तो हजेरी लावत आहे. पावसामुळे जिल्ह्याचा पारा थेट २९.८ अंशावर आला असून जिल्हावासीयांची उन्हापासून सुटका झाली आहे. त्यातच आता हवामान खात्याने येत्या बुधवारपर्यंत (दि.१०) जिल्ह्यात वादळवारा, ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मार्च महिन्यापासून जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्यातही एप्रिल महिन्यात उन्हाळा आपल्या रंगात येत असतानाच अवकाळीने एंट्री मारली व तपत्या उन्हाला रोखून धरले. परिणामी काही मोजके दिवस सोडले असता पाहिजे तसा उन्हाळा तपलेला नाही. वातावरणाचा हा लहरीपणा सुरू असतानाच हवामान खात्याने शुक्रवारपर्यंत (दि.५) अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार, जिल्ह्यात अवकाळी पाऊस आपली हजेरी लावताना दिसत आहे. परिणामी तापमान घसरले असून गुरुवारी (दि.४) पारा २९.८ अंशावर आला होता. असे असतानाच आता हवामान खात्याने येत्या बुधवारपर्यंत (दि.१०) जिल्ह्यात वादळवारा, ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
सामान्यांची मजा मात्र शेतकऱ्यांना सजा
अवकाळी पावसामुळे जिल्ह्याचा पारा चांगलाच घसरला असून २९ अंशावर आला आहे. परिणामी उकाड्यापासून जिल्हावासीयांची सुटका झाली असून मे महिनासुद्धा असाच निघून जाओ, अशी कामना ते करीत आहेत. सामान्यांची मजा होत असतानाच मात्र शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस सजा देताना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कित्येक शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले धान पावसाच्या तावडीत आले आहे. तर कापणीला आलेले धान जमिनीवर लोळले आहे. अशात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.