तिबेटियनांचा ‘थँक यू इंडिया’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:31 PM2018-12-12T23:31:52+5:302018-12-12T23:32:18+5:30
ज्या मातृभूमीत जन्मलो, तेवढेच प्रेम भारत मातेने केले. या प्रेमाच्या वर्षावामुळे आम्ही परेदशात निर्वासित आहोत हे कधीच वाटले नाही. भारतीयांच्या प्रेमळ वागणुकीमुळे आम्ही पुलकित झालो आहोत. याचे ऋण फेडू शकत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : ज्या मातृभूमीत जन्मलो, तेवढेच प्रेम भारत मातेने केले. या प्रेमाच्या वर्षावामुळे आम्ही परेदशात निर्वासित आहोत हे कधीच वाटले नाही. भारतीयांच्या प्रेमळ वागणुकीमुळे आम्ही पुलकित झालो आहोत. याचे ऋण फेडू शकत नाही. आपलेही काही देणे आहे या भावनेतून ‘ कव्हर द कोल्ड’ हा कार्यक्रम नार्गोलिंग तिबेटीयन वसाहत प्रतापगड येथे बुधवारी साजरा करण्यात आला.
१० डिसेंबर १९८९ रोजी तिबेट सरकारचे प्रमुख व सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचा वर्धापन दिवस दरवर्षी तिबेटीयन बांधव साजरा करतात. प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना घेवून विविध उपक्रम या वसाहतीत साजरे केले जातात. यापूर्वी ग्रिन इंडिया, स्वच्छ भारत, भूखा है उसे खिलाओ अशी नानाविध कार्यक्रम राबविण्यात आले. या वर्षी थँक यू इंडियाच्या माध्यमातून कव्हर द कोल्ड हा उपक्रम राबविला जात आहे. भारतीय आमचे बांधव आहेत.दरिद्र हे प्रत्येक देशातच कमी जास्त प्रमाणात असते.
गरीबीमुळे काही लोकं उबदार वस्त्रे परिधान करु शकत नाहीत. अशा लोकांना कडाक्याच्या थंडीतून बचावासाठी उबदार वस्त्र द्यावेत हा या कार्यक्रमामागील हेतू आहे. हिवाळ्यात स्वेटर, जॅकेट यासारखी उबदार वस्त्रे विक्री करण्याचा तिबेटीयनांचा मुख्य व्यवसाय आहे. गोरगरीबांना उबदार वस्त्र देण्याचा संकल्प त्यांनी केला. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा येथे उबदार वस्त्रे विक्री करणाऱ्या या व्यावसायीकांनी सुमारे ५ ते ६ लाख रुपये किमतीचे लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंतची उबदार वस्त्रे पाठविली. सुमारे २ हजार लोकांना ही उबदार वस्त्रे वितरीत करण्याचा संकल्प आहे. त्याअंतर्गत बुधवारी तिबेटीयन वसाहत कार्यालयासमोर वितरण सुरू करण्यात आले.
याचा जवळच्या खेडेगावातील लोकांनी लाभ घेतला. उर्वरित उबदार वस्त्रे ही शाळा व खेडेगावात प्रत्यक्ष जावून दिली जाणार आहेत.
भारताने सर्वकाही दिले
भारत सरकार व भारतीय लोकं यांनी आम्हाला जे दिलं, ते कुणीही दिलं नाही. अगदी भरभरुन दिलं. देशवासी व स्थानिकांच्या सहकार्याने आम्ही येथे गुण्यागोविंदाने नांदत आहोत. चिनने तिबेटवर कब्जा केल्यानंतर आमच्या मातीत आम्हाला स्वातंत्र्य नाही. पण आम्ही भारत देशात अगदी स्वातंत्र्यात असल्यासारखेच आहोत. १० डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिनाचा वर्धापन दिवस याच दिवशी सर्वोच्च आध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. या दिनाचे औचित्य साधून धन्यवाद मानन्याचे हेतूने ‘थँक यू इंडिया’ हा कार्यक्रम राबविला जात आहे.
- ढुन्डूप ग्यान पो
वसाहत अधिकारी, नार्गेलिंग तिबेटीयन वसाहत प्रतापगड