बस थांब्यांवर तिकिट बुकिंग एजंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 09:03 PM2019-02-10T21:03:00+5:302019-02-10T21:04:10+5:30
राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढावे तसेच प्रवाशांच्या सोयीकरिता आता प्रवासी थांब्यांवर ‘तिकिट बुकिंग एजंट’ची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी परिवहन महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीसह करार केला आहे. या प्रयोगाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढावे तसेच प्रवाशांच्या सोयीकरिता आता प्रवासी थांब्यांवर ‘तिकिट बुकिंग एजंट’ची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी परिवहन महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीसह करार केला आहे. या प्रयोगाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. सध्या शहरातील रेल्वे स्थानक तसेच जयस्तंभ चौकात तिकीट बुकींग एजंटची नेमणूक करण्यात आली असून काही दिवसांत अजून काही बस थांब्यांवर हे तिकीट बुकींग एजंट नेमले जाणार आहेत.
आजघडीला अवैध प्रवासी वाहन राज्य परिवहन मंहामंडळासाठी डोकेदुखी ठरत आहेत. या प्रवासी वाहनांमुळे परिवहन महामंडळ तोट्यात जात आहे. यात कुठेतरी परिवहन महामंडळाची बाजू कमजोर असणे हे देखील कारण असू शकते. कित्येकदा बसेसमध्ये वाहक नसल्याने प्रवाशांची सुविधा होत नाही. प्रवासी अन्य खासगी प्रवासी वाहनांकडे वळतो. कित्येकदा वाहकच प्रवाशांना तिकीट न देता अपहार करीत असल्याचेही प्रकार घडले आहेत. याचा परिवहन महामंडळालाच भुर्दंड बसतो. या सर्व प्रकारावर तोडगा काढता यावा. यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आता नवीन प्रयोग हाती घेतला आहे. यांतर्गत राज्य परिवहन महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी आता प्रवासी थांब्यांवर ‘तिकीट बुकींग एजंट’ची नेमणूक करणार आहे. हे एजंट त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी वेळेवर हजर राहून देण्यात आलेल्या मशीनद्वारे प्रवाशांना तिकीट देवून बसमध्ये बसवून देतील. वाहक नसलेल्या बसच्या चालकाला तिकीट कलेक्शन रिपोर्ट देतील. यामुळे आता प्रवाशांना तिकीटसाठी बस थांब्यांवर एजंट मिळणार असून गरज पडल्यास हे एजंट त्यांना बसमध्ये बसवून देणार असल्याने प्रवाशांना अधिक सोयीचे होणार आहे.
या एंजटवर आगार व्यवस्थापक व बसस्थानक प्रमुखाचे नियंत्रण राहणार असून त्यांच्याकडून अपेक्षीत कामाची तपासणी, प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाची माहिती दररोज घेतील. दररोजच्या तिकीट विक्रीचा रिपोर्ट तसेच एजंटांनी बुकींग केलेल्या तिकिटांची फेरीनिहाय माहिती विशेष प्रोग्राममध्ये दिसणार आहे. एजंटला थांब्याच्या ठिकाणी हजर राहण्याबाबत आदल्या दिवशी नियोजन करावयाचे आहे. तसेच विभागीय वाहतूक अधिकारी, मार्ग तपासणी पथक तसेच सुरक्षा व दक्षता खाते यांनी वेळोवेळी थांब्यांवर जावून एजंटची तपासणी करावयाची आहे. गैरप्रकार आढळल्यास त्वरीत मध्यवर्ती कार्यालय महाव्यवस्थापकांना अहवाल पाठवायचा आहे. या प्रयोगामुळे आता वाहकांचा मनमर्जीपणा व होणारे अपहाराचे प्रकारही संपुष्टात येणार आहे.
तालुका स्थळाच्या स्थानकांवर होणार नेमणूक
परिवहन महांडळाकडून सध्या शहरातील रेल्वे स्टेशन व जयस्तंभ चौकात तिकीट बुकींग एजंटची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र मध्यंतरी बालाघाट बसमध्ये काहीतरी घोळ दिसून आल्याने लगेच बालाघाट व बैहर येथे एजंटची नेमणूक करण्यात आली. आता जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव व देवरी या तालुका स्थळांवरील बस स्थानकांसह रावणवाडी व रजेगाव येथील थांब्यांवर एजंटची नेमणूक केली जाणार आहे. येत्या ८ दिवसांत येथे एजंटची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती आहे.