तिडकावासीयांना २२ वर्षांपासून मिळत नाही शुद्ध पाणी; गावकऱ्यांनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 05:52 PM2024-08-08T17:52:30+5:302024-08-08T17:53:03+5:30
Gondia : पाणीपुरवठा योजना नावालाच
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेपवनी येथे गटग्रामपंचायत आहे. धाबेपवनीवरून ७ किमी अंतरावर गोठणगाव इटियाडोह धरणाच्या किनाऱ्यावर वसलेल्या तिडकावासीयांना अद्यापही जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळालेले नाही. परिणामी, गेल्या २२ वर्षांपासून येथील गावकरी शुद्ध पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.
केंद्र शासनाने सन २०२४ पर्यंत देशातील संपूर्ण ग्रामीण व आदिवासी भागातील प्रत्येक कुटुंबाला 'घर तेथे नळ' देऊन शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी 'जल जीवन मिशन' योजना २०१९ मध्ये सुरू केली. परंतु, सन २०२४ अर्ध्याहून अधिक संपले तरीसुद्धा आजही ग्रामीण भागात 'घर तेथे नळ' योजना पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही. तिडका हे गाव शंभर टक्के आदिवासी गाव असून, लोकसंख्या ३६५ व १७० कुटुंबे आहेत. गावात जि. प. प्राथमिक शाळा व अंगणवाडी आहे. येथे सन २००३-०४ मध्ये पाणी टाकी व पाइपलाइन जोडणी करण्यात आली. पण, अद्यापही त्या पाणी टाकीतील पाणी गावकऱ्यांना मिळाले नाही. पाणी टाकी निकृष्ट दर्जाची तयार केल्याने ती केव्हाही कोसळू शकते. ही पाणी टाकी रस्त्यालगत असून, टाकीच्या तिन्ही बाजूंना घरे आहेत. पूर्व, दक्षिण दिशेला विद्युत तारांची लाइन असल्याने त्या विद्युत तारेवर पाण्याची टाकी पडल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सन २०१३-१४ मध्ये तिडका येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नवीन पाणी टाकी तयार करण्यात आली. पाइपलाइन टाकून नळ जोडणी करण्यात आली. पण, या पाणी टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने सन २०१५-१६ मध्ये पाणी सुरू करताच टाकीमधून पाणी गळणे सुरू झाले होते. ही समस्या अद्यापही मार्गी लावण्यात आली नसून गावकऱ्यांची अडचण कायम आहे.
दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च
केंद्र शासनाने सन २०१९ ते २०२४ पर्यंत जल जीवन मिशन योजनेंतर्गत घर तेथे नळ योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जल जीवन मिशन योजनेंतर्गत 'हर घर नल, हर घर जल' ही योजना राबवित असताना सन २०२४ च्या मार्च, एप्रिल, मे महिन्यात लाखो रुपये मंजूर करून निकृष्ट बांधकाम केलेल्या सन २०१४-१५ च्या पाणी टाकीला दुरुस्ती करून रंगरंगोटी करून पुन्हा लाखो रुपये खर्च केले आहेत. तिडका येथील सरपंच कचलाम यांनी सांगितले की, सन २००३-०४ मध्ये तयार केलेल्या पाणी टाकीतून पाणी मिळालेच नाही. मात्र, कंत्राट- दाराला पुन्हा लाखोचे बिल मिळाले. येथील योजना गेल्या २२ वर्षापासून नाममात्र ठरत आहे.
"२००३ पासून तिडका येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजना अजूनही कार्यान्वित झाली नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी. गेल्या २२ वर्षांपासून आदिवासी बांधव शुद्ध पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा करीत आहेत. ही निंदनीय बाब आहे."
- चंद्रकला ठवरे, पंचायत समिती सदस्य, झाशीनगर क्षेत्र