व्याघ्र प्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 08:31 PM2019-06-30T20:31:37+5:302019-06-30T20:32:06+5:30
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. त्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लाभले आहे. मात्र व्याघ्र प्रकल्प अन्य प्रकल्पांच्या तुलनेत कोठेतरी कमी पडत आहेत. आता वन खाते माझ्याकडे असल्याने येथील व्याघ्र प्र्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगीतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. त्यात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लाभले आहे. मात्र व्याघ्र प्रकल्प अन्य प्रकल्पांच्या तुलनेत कोठेतरी कमी पडत आहेत. आता वन खाते माझ्याकडे असल्याने येथील व्याघ्र प्र्रकल्पाचा ताडोबाच्या धर्तीवर विकास करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगीतले.
मंत्रीपद स्वीकारल्यानंतर येथे रविवारी (दि.३०) येथे प्रथमच आगमन झाले असता शासकीय विश्रामगृहात आयोजीत पत्र परिषदेत पत्रकारांसोबत चर्चा करताना ते बोलत होते. पुढे बोलताना नामदार डॉ. फुके यांनी, गोंदिया जंगलांचा जिल्हा आहे. मात्र सध्या आहे त्या व्याघ्र प्रकल्पाच्या विकासावर जोर दिला जाणार आहे. यासाठी रविवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. तसेच काही उपाययोजना डोक्यात असून एयर बी एन बी या कंपनीसोबत चर्चा झाली असून त्यांनी सर्वेक्षण केले आहे. जिल्ह्याला टुरिजम पॅलेस बनवायचे असून असे झाल्यास जिल्ह्यात टुरिजम वाढणार व यातून सुमारे २० हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील रिक्त पदांच्या विषयी माहिती देताना त्यांनी, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची यादी दिली आहे. रिक्त पदांमुळे नक्कीच कामे वेळेत होत नसल्याने सर्वच विभागांतील रिक्त पद तसेच पेंडींग कामांची यादी मागविली आहे. यातील जी कामे जनता दरबारातून सुटणार त्यांना लगेच सोडविणार असून मोठ्या कामांना बघणार असल्याचेही नामदार फुके म्हणाले. जिल्हा परिषदेत कॉँग्रेस सोबत कोव्हापर्यंत युती असल्याचे विचारले असता त्यांनी, जोपर्यंत जिल्हा कॉँग्रेस मुक्त होत नाही तोपर्यंतच ही युती असल्याचे उत्तर दिले.
दर शनिवारी जनता दरबार
याप्रसंगी नामदार फुके यांनी आठवड्यातील तीन दिवस गोंदियाला देणार असल्याचे सांगीतले. तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार असून यासाठी दर शनिवारी जनता दरबार घेणार. त्यात जिल्हाधिकाºयांपासून अन्य सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित राहतील व यासाठी सर्वांना सूचना दिल्या जाणार आहेत. मिळालेल्या तीन महिन्यांत त्या दृष्टीनेच काम करावयाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते संपर्कात
सध्या सुरू असलेल्या नेत्यांच्या प्रवेशावरील चर्चांवर बोलताना नामदार फुके यांनी, कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील मोठ्या प्रमाणात नेते आमच्या संपर्कात आहेत. ते फक्त आमच्या ‘हो’ म्हणण्याची वाट बघत आहेत. आज भाजप आपल्या बळावर निवडून आली असून आम्हाला कुणाचीही गरज नाही. तरिही पक्षात संयुक्तरित्या निर्णय घेतले जात असल्याचे ते म्हणाले.
कुणालाही मंत्रिपदावरून काढले नाही
राजकुमार बडोले यांच्या मंत्रिपदाच्या विषयावर बोलताना नामदार फुके यांनी, बडोले यांनी त्यांच्या बैयक्तीक कारणांतून राजीनामा दिला. त्यांनी आपल्या साडे चार वर्षांच्या कार्यकाळात कित्येक चांगली कामे केली असून मिळालेल्या तीन महिन्यांत त्यांची कामे पुढे घेऊन जायची आहेत. शिवाय, कुणालाही मंत्रीपदावरून काढले नसल्याचेही ते म्हणाले.