कारच्या धडकेत जखमी झालेल्या वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरालगतची घटना
By अंकुश गुंडावार | Published: August 11, 2023 12:44 PM2023-08-11T12:44:22+5:302023-08-11T12:46:40+5:30
उपचारासाठी नेत असताना वाटेतच झाला मृत्यू
गोंदिया : कारच्या धडकेत वाघ गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.१०) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल परिसरात घडली होती. दरम्यान जखमी वाघाला नागपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.११) सकाळी त्याचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार मागील दिवसांपासून मुरदोली जंगल परिसरात टी-१४ या वाघ व त्याच्या बच्छड्यांचा वावर होता. या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना वाघ आणि त्याच्या बच्छड्याचे दर्शन झाले होते. दरम्यान गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमारास गोंदिया -कोहमारा मार्गावर मुरदोली जंगलातून मुख्य रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने वाघाला धडक दिली होती. यात वाघ जखमी झाला होता. दरम्यान जखमी झालेल्या वाघावर उपचार करण्यासाठी त्याला जेरबंद करण्याची मोहीम वन्यजीव विभागाकडून शुक्रवारी (दि.११) पहाटेपासून शोध मोहीम राबविण्यात आली.
सकाळी ७:३० वाजता जखमी वाघाला जेरबंद करण्यात वन्यजीव विभागाला यश आले. दरम्यान त्याला जेरबंद करुन उपचारासाठी नागपूर येत नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याचे मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मृतक वाघाचे शवविच्छेदन नागपूर गोरेवाडा येथे करण्यात येणार असून तिथेच दफन केले जाणार आहे.
गंभीर जखमी झाल्यानेच वाघाचा मृत्यू
कारच्या धडकेत गंभीर जखमी झाल्यामुळे तो फारशी हालचाल करु शकत नव्हता. त्यामुळे हा वाघ अपघात झाला त्या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर वन्यजीव विभागाला रेस्क्यू दरम्यान सापडला. शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता रेस्क्यू करुन उपचारासाठी नागपूर येत नेत असताना ८:३० वाजताच्या सुमारास जखमी वाघाचा मृत्यू झाल्याचे झाल्याचे बहेकार यांनी सांगितले.
रेस्क्यूमध्ये यांचा सहभाग
वन विभागाचे उपवसंरक्षक प्रमोद पांचभाई , विभागीय अधिकारी अतुल देवकर, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर, सहायक वनंरक्षक राजेंद्र सदगिर, वनपरिक्षेत्र अधिकारी रवी भगत, आरआरटी साकोली व नवेगावबांध चमूचा सहभाग होता.
उपाययोजना करण्याची गरज
मुरदोली परिसरात नेहमी वाघ व इतर वन्यप्राण्यांचा वावर असतो. या परिसरात हायवेमुळे नेहमी वन्यप्राणी मृत्यूमुखी पडतात. हा मार्ग नागझिरा-नवेगाव कॉरिडॉर मधील पूर्व नागझिरा परिसरातून जातो आहे. त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.