नवेगावबांधमध्ये वाघाची डरकाळी कायम
By admin | Published: May 15, 2017 12:14 AM2017-05-15T00:14:48+5:302017-05-15T00:14:48+5:30
येथील राष्ट्रीय उद्यानाच्या कोअर झोनमध्ये बुध्दपौर्णिमेला प्राणिगणना करण्यात आली.
१,६७४ वन्यप्राण्यांच्या नोंदी : बुध्दपौर्णिमेला झाली वन्य प्राणिगणना
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील राष्ट्रीय उद्यानाच्या कोअर झोनमध्ये बुध्दपौर्णिमेला प्राणिगणना करण्यात आली. यात एक वाघ आढळल्याने नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात वाघाची डरकाळी कायम असल्याचे सिध्द झाले. शिवाय दोन बिबट, २८५ रानगवे, ४४ चितळ, २९ सांबरासह एकूण १६७४ वन्यप्राण्यांची नोंद आॅनलाईन करण्यात आली. ४७ प्रगणकांनी ही नोंदणी केली.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात ९ व १० मे रोजी पाणवठ्यावर ४७ मचाणी उभारण्यात आल्या होत्या. प्रगणकासाठी नोंदणी होऊनही काही प्रगणक उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे आठ कर्मचाऱ्यांचा प्रगणकांमध्ये समावेश करण्यात आला. ३४ परुष, पाच महिला, आठ वनकर्मचारी अशा एकूण ४८ प्रगणकांनी अहोरात्र जागून वन्यप्राण्यांची गणना केली. तृणभक्षी प्राण्याच्या संख्येत वाढ झाल्याचे या वेळी दिसून आले.
वनविभागाच्यावतीने प्रत्येक मचाणावर पिण्याच्या पाण्याची, नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. प्रगणकाच्या सुरक्षेचीही काळजी विभागाकडून करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी पाटील यांनी दिली. वन्यप्राण्यांच्या वाढ व संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात १० बोअरवेल्स बसविण्यात आल्यात तर तीन नवीन बोअरवेल्स तयार करण्यात आल्या आहेत. वन्यप्राणी संरक्षणासाठी १० शिबिर असून नवीन तीन शिबिर प्रस्तावित असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
मानवी वावर रोखण्यासाठी समित्या स्थापन
जंगलात लाकूड किंवा अन्य बाबींकरीता मानवी वावर वाढला आहे. हा वावर कमी व्हावा, याकरीता बफरझोनच्या ५ किमी. अंतराच्या आतील गावात शामाप्रसाद मुखर्जी समिती स्थापन करण्यात आली. प्रत्येक गावपातळीवरील समितीला अनुदान देण्यात आले. २०१५-१६ मध्ये चार समित्या होत्या. त्यांची संख्या आता २१ वर गेली आहे. वनालगतच्या गावांमध्ये एलपीजी गॅस कनेक्शन, शौचालय, गॅस ओटे, शेतावरील विहिरीला कठडे, पाणी पुरवठ्यासाठी गावातील बोडी, तलावांचे खोलीकरण करणे, पथदिवे, निर्धूर चुली या कामांचा समावेश समितीच्या अंतर्गत असतो.
अशी आहे प्राण्यांची संख्या
या वन्यप्राणी प्रगणनेमध्ये राष्ट्रीय उद्यानात अस्तित्व असलेल्या चांदी अस्वल, रानमांजर, ससा, घोरपड, विंचू, लाजवंती, वानर यांची नोंद झाली नाही हे येथे उल्लेखनीय आहे. तर लालतोंडे माकडे २१५, काळतोंडे माकडे ७७८, बेडूक ११, नीलगायी ४४, रानगवे २८५, बिबट दोन, वाघ एक, अस्वल ३७, रानडुकरे १२८, सायळ सहा, मुंगूस १५, चितळ ४४, मोर २५, रानकुत्रे ४८, सांबर २१, खवल्या मांजर एक असे एकूण १,६७४ वन्यप्राण्यांची नोंद वन्यप्राणी प्रगणनेत झाली.