कुजलेल्या अवस्थेत आढळले वाघाचे अवयव; मृत्युचे गुढ कायम

By अंकुश गुंडावार | Published: March 30, 2024 09:08 PM2024-03-30T21:08:50+5:302024-03-30T21:09:26+5:30

जमीदारी पालांदूर परिसरातील घटना : वाघाच्या मृत्युचे गुढ कायम

Tiger organs found in decaying state; The mystery of death remains | कुजलेल्या अवस्थेत आढळले वाघाचे अवयव; मृत्युचे गुढ कायम

कुजलेल्या अवस्थेत आढळले वाघाचे अवयव; मृत्युचे गुढ कायम

गोंदिया : देवरी तालुक्यातील पालांदूर जमीपासून १ किमी अंतरावर असलेल्या जंगलात वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना शुक्रवारी (दि.२९) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. मृत वाघाचे अवयव घटनास्थळापासून तब्बल शंभर ते दीडशे फुटापर्यंत पसरलेले होते. त्यामुळे वाघाचा नैसर्गिक मृत्यु की शिकार याचे गुढ कायम आहे.

देवरी तालुक्यातील पालांदूर जमीपासून १ किमी अंतरावरील जंगलातील कक्ष क्रमांक ९८ मध्ये २९ मार्च रोजी सायंकाळी गस्त घालत असलेल्या वनरक्षकाला दुर्गंधी आली. त्या दुर्गंधीच्या दिशेने ते गेल्यावर त्यांना वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी ही बाब वरिष्ठांना वेळीच कळविली. त्यानुसार वरिष्ठांनी ३० मार्च रोजी पालांदूर जमी येथील घटनास्थळ गाठून त्या भागाची पाहणी केली. या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत वाघ दिसला. त्या वाघाचे अवयव घटनास्थळापासून शंभर ते दीडशे फुटांवर आढळले. मृत पावलेल्या वाघाचे इतर प्राण्यांनी लचके तोडले असावे असा कयास लावला जात आहे. गोंदिया येथील उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, नागपूरच्या गोरेवाडा येथील रेस्क्यू टीमचे डॉ. सुजीत कोलंगत, देवरी येथील पशूधन विकास अधिकारी डॉ. पारधी, वन्यजीव मानद रक्षक मुकूंद धुर्वे, वन्यप्रमेमी सावन बहेकार यांनी घटनास्थळ गाठून त्या वाघाचे अवयवाचे नमुने घेतले. ते प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत.

.......
मृत्यूचे कारण अस्पष्टच

कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या वाघाची शिकार झाली की वन्यप्राण्यांचा एकमेकांवरील हल्ला झाला. किंवा म्हातारपणामुळे त्या वाघाचा मृत्यू झाला ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही. वाघाचे अवय शंभर ते दिडशे फुटांवर पसरले होते. परंतु जे अवयव लांब मिळाले त्यात हाताचे पंजे, नख साबूत असल्याची माहिती आहे.
 

विषबाधा किंवा करंटने तर मृत्यू नाही ना?
वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी विषबाधा केली जाते. किंवा करंट लावून वन्यप्राण्यांची शिकार केली जाते. यातील तर हा प्रकार नाही ना? रानडुकरांच्या शिकारीसाठी करंट लावला अन् वाघाचा मृत्यू झाला अशी तर ही घटना नाही, या सर्व दृष्टीने तपास वनविभागाकडून केला जात असल्याचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई यांनी सांगितले. उत्तरीय तपासणी अहवाल येईपर्यंत वाघाचा मृत्यू कशाने झाला हे सांगता येत नाही असे त्यांनी म्हटले.


घटनास्थळाजवळ पाला-पाचोळा जळालेला

आता मोहफुल वेचन्याचे काम जोमात आहे. मोहफुल वेचण्यासाठी काही लोकांनी झाडाखाली आग लाऊन मोहफुल वेचण्यासाठी पालापाचोळा जाळण्यात आला होता. म्हणजेच त्या ठिकाणी नागरिकांचा वावर आहे. त्यांना यापूर्वी वाघ दिसला किंवा नाही याची पडताळणी केली जात आहे.

कॅमेऱ्यात वाघ आलाच नाही
वन्यप्राण्याचे वावर असलेल्या या ठिकाणी वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु या कॅमेऱ्यात बिबट कैद झाला आहे मात्र वाघ कैद झाला नव्हता. तो वाघ कुठून आला, बिबट आणि वाघाचे युध्द तर झाले नाही? किंवा म्हातारपणामुळे शिकार न करू शकणाऱ्या वाघाचा भुकेने व्याकूळ होऊन तर मृत्यू झाला नाही ना अशी शंका येत आहे.

Web Title: Tiger organs found in decaying state; The mystery of death remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.