आठ दिवसांपासून वाघीण सापडेना, अधिकाऱ्यांना चैन पडेना !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:05 PM2023-06-07T12:05:21+5:302023-06-07T12:05:38+5:30
पांगडी तलाव परिसरात वाघिणीचा मुक्काम : टायगर रिझर्व्ह टीम केली पाचारण
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या दोन वाघिणींपैकी एक वाघीण भरकटत गोंदिया तालुक्यातील पांगडी परिसरात आली आहे. या वाघिणीचा मुक्काम मागील आठ दिवसांपासून याच परिसरात आहे, तर या वाघिणीला परत नवेगाव-नागझिरा प्रकल्पात नेण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी सातत्याने प्रयत्न करीत आहेत; पण वाघीण सापडत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना चैन पडत नसल्याचे चित्र आहे.
राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत २० मे रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागातील दोन वाघिणी सोडण्यात आल्या होत्या. यापैकी एक वाघीण २७ मे रोजी या प्रकल्पातून भरकटली. ही वाघीण सुरुवातील गोरेगाव तालुक्यातील डव्वा, रापेवाडा, पिंडकेपार परिसरात आढळली. त्यानंतर ३० मे रोजी या वाघिणीचे लोकेशन गोंदिया तालुक्यातील पांगडी परिसरात आढळले. काही गावकऱ्यांना या वाघिणीचे दर्शनसुद्धा झाले. ३० मे पासून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची चमू या वाघिणीला परत प्रकल्पात नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे; पण या चमूच्या हाती ही वाघीण लागत नसल्याचे चित्र आहे.
मंगळवारी (दि. ६) या वाघिणीचे लोकेशन पांगडी तलाव परिसरात आढळले. त्यामुळे वन विभागाची चमू याच परिसरात मागील आठ दिवसांपासून तळ ठोकून आहे, तर या परिसरात वाघिणीचा वावर असल्याने पांगडी जलाशय परिसरात जाण्यास पर्यटकांना मागील आठ दिवसांपासून बंदी घालण्यात आली आहे. या जलाशयाकडे जाणारे सर्व रस्तेसुद्धा बंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या परिसरातील छोटे मोठे हॉटेल व पानठेलेसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, वाघिणीचा या परिसरात वावर असल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्येसुद्धा गेल्या आठ दिवसांपासून भीतीचे वातावरण आहे.
वन विभागाच्या चमूची चोवीस तास नजर
पांगडी परिसरात मागील आठ दिवसांपासून वाघिणीने तळ ठोकला आहे. त्यामुळे वन विभागाची दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांची चमूसुद्धा याच परिसरात तळ ठोकून आहे. या वाघिणीपासून गावकऱ्यांना कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. वन विभागाची चमू या परिसरात चोवीस तास नजर ठेवून आहे.
टायगर रिझर्व्ह चमूला केले पाचारण
नवेगाव-नागझिरा प्रकल्पातून भरकटलेल्या वाघिणीेला परत या प्रकल्पात परतावून लावण्यासाठी वन विभागाची चमू मागील आठ दिवसांपासून प्रयत्न करीत आहे; पण यात त्यांना अद्यापही यश आले नाही. त्यामुळे आता टायगर रिझर्व्ह चमूला पाचारण करण्यात आले आहे. या वाघिणीला पकडून पुन्हा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यासाठी वन व वन्यजीव विभागाने प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे.