सक्रांतीनिमित्त महिलांना ‘तिळाची’ भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 08:45 PM2018-01-09T20:45:19+5:302018-01-09T20:46:28+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव स्थिर दिसत असल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे वाणात ‘तिळाची’ भेट मिळाली आहे.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव स्थिर दिसत असल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे वाणात ‘तिळाची’ भेट मिळाली आहे. त्यामुळे संक्रातीनिमित्त तीळ खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. अशात यंदा तिळाचे लाडू बिनधास्त खाता येणार असल्याचे दिसते.
‘तिळ-गुळ खा व गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे. बाजारात तिळ दिसताच संक्रातीची आठवण येते व डोळ््यापुढे येतात ते तिळाचे लाडू. तिळाचे भाव चांगलेच उंचावलेले राहत असल्याने तिळाचे लाडू बनवितानाही बजेटवर नजर ठेवावी लागते. मात्र मागील वर्षापासून तिळाचे चांगले उत्पादन होत असल्याने तिळाचे भाव स्थिर दिसून येत आहे. परिणामी महिलांना संक्रांतीत दिलासा मिळाला आहे.
संक्रात आली की तिळ-गुळ या दोन वस्तूंची खरेदी वाढते. आता रविवारी (दि.१४) संक्रांत आली असल्याने महिला व पुरूषांची बाजारात तीळ-गुळ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. येथे दुकानांसोबतच बाजारात रस्त्यावर दुकानी लावून तीळ विकणारे विक्रेतेही ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्या घरचे उत्पादन किंवा ग्रामीण भागातून खरेदी करून शहरात विकण्यासाठी ते दुकान लावत असल्याचे दिसते.
हाच प्रकार यंदाही बाजारात दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला दुकान लावून तिळ व गूळ विकले जात असून जागोजागी हातठेलेही दिसत आहेत. सध्या या विक्रेत्यांकडे खरेदी करणाºयांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. यंदा भाव कमी असल्याने थोडे जास्त लाडू तयार करून त्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठीचीही तयारी दिसत आहे.
तीळ १०० रुपयापासून
गोंदियाच्या बाजारात सध्या पांढरे व काळ््या दान्याचे तीळ विक्रीला आले आहे. यात पांढरे व काळ््या दान्याचे तीळ १०० रूपये किलो दराने विकले जात आहे. शिवाय ४० रूपये किलो दराने गुळ विकला जात आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही तिळाचे दर असेच होते. चांगले उत्पादन झाल्याने तीळाचे भाव स्थिर दिसत आहे. दर स्थिर असल्याने ग्राहक चांगलीच खरेदी करीत असल्याचेही येथील विक्रेते छबीलाल बानासुरे यांनी सांगीतले.
रेडिमेड पपडीही उपलब्ध
आजच्या युगात प्रत्येकच वस्तू किंवा पदार्थ रेडीमेड उपलब्ध असतानाच बाजारात तिळाची पपडीही रेडिमेड विकली जात आहे. धकाधकीच्या जीवनात तिळ खरेदी करून त्याचे लाडू व पपडी तयार करण्यासाठी नोकरदार महिलांकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे त्यांचा कल रेडीमेड पपडीकडे असतो. नेमकी हीच बाब हेरून बाजारात रेडीमेड पपडी उपलब्ध करण्यात आली आहे.
तीळ-गुळ सेवनामागे औषधीय लाभ
मकर सक्रांत येते तेव्हा शिशिर ऋतू शेवटच्या टप्यात असतो. थंडीत शरिरात कफ वाढून जमा होतो. तसेच वाताचा त्रासही असतो. आयुर्वेदानुसार तीळ हे सर्वाेत्कृष्ट स्नेह द्रव्य असल्याने त्याच्या जोडीला गुळ दिल्यास कफाचं पचन होऊन वाताचं शमन होते. त्यामुळे पुढे येणाºया वसंत ऋतूतील ऋतूजन्य (सिजनल व वायरल) आजारांचा त्रास होत नाही. त्यामुळेच संक्रांतीत तीळ-गुळ खाण्याची परंपरा पूर्वजांनी सुरू केल्याचे वैद्य सांगतात.