संक्रांतीनिमित्त महिलांना ‘तिळाची’ भेट
By admin | Published: January 10, 2016 02:04 AM2016-01-10T02:04:47+5:302016-01-10T02:04:47+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव घसरल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे वाणात ‘तिळाची’ भेट मिळाली आहे.
यावर्षी भाव घसरले : गोडवा वाढल्याने खरेदीसाठी वाढली गर्दी
गोंदिया : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव घसरल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे वाणात ‘तिळाची’ भेट मिळाली आहे. जेमतेम चार दिवसांवर आलेल्या संक्रातीनिमित्त तीळ खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. त्यामुळे यंदा तिळाचे लाडू बिनधास्त खाता येणार असल्याचे दिसते.
‘तिळ-गुळ खा व गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे. बाजारात तिळ दिसताच संक्रातीची आठवण येते व डोळ््यापुढे येतात ते तिळाचे लाडू. मात्र तिळाचे भाव चांगलेच उंचावलेले राहत असल्याने तिळाचे लाडू बिनवितानाही बजेटवर नजर ठेवावा लागते. यंदा मात्र तिळाचे विक्रमी उत्पादन झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत तिळाचे भाव काही प्रमाणात उतरले असून महिलांना दिलासा मिळाला आहे.
संक्रात आली की तिळ-गुळ या दोन वस्तूंची खरेदी वाढते. आता जेमतेम चार दिवसांवर संक्रांत आली असल्याने महिला व पुरूषांची बाजारात तीळ-गुळ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. येथे दुकानांसोबतच बाजारात रस्त्यावर दुकानी लावून तीळ विकणारे विक्रेतेही ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्या घरचे उत्पादन किंवा ग्रामीण भागातून खरेदी करून शहरात विकण्यासाठी ते दुकान लावत असल्याचे दिसते.
हाच प्रकार यंदाही बाजारात दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला दुकान लावून तिळ व गूळ विकले जात असून जागोजागी हातठेलेही दिसत आहेत. सध्या या विक्रेत्यांकडे खरेदी करणाऱ्यांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. यंदा भाव कमी असल्याने थोडे जास्त लाडू तयार करून त्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठीचीही तयारी दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)
१०० रुपये किलो
गोंदियाच्या बाजारात सध्या पांढरे व काळ््या दान्याचे तीळ विक्रीला आले आहे. यात पांढरे तीळ १२० रूपये तर काळ््या दान्याचे तीळ १०० रूपये किलो दराने विकले जात आहे. शिवाय ४० रूपये किलो दराने गुळ विकला जात आहे. यंदा मात्र तिळाचे चांगले उत्पादन झाल्याने तीळाचे भाव घसरले आहे. मागील वर्षी हेच पांढरे तीळ २५० रूपये तर काळ््या दान्याचे तीळ २०० रूपये दराने विकल्याचेही विक्रेत्या बिरजूलाबाई निखाडे यांनी सांगितले.
रेडिमेड पापडीही उपलब्ध
आजच्या युगात प्रत्येकच वस्तू किंवा पदार्थ रेडीमेड उपलब्ध असतानाच बाजारात तिळाची पापडीही रेडीमेड विकली जात आहे. धकाधकीच्या जीवनाच तीळ खरेदी करून त्याचे लाडू व पापडी तयार करण्यासाठी नोकरदार महिलांकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे त्यांचा कल रेडीमेड पापडीकडे असतो. नेमकी ही बाब हेरून बाजारात रेडीमेड पापडी उपलब्ध करण्यात आली आहे. २४० रूपये किलो दराने ही पापडी सध्या विकली जात आहे.
बाजारात काटीचे तीळ
येथील बाजारात मोठ्या प्रमाणात तालुक्यातील ग्राम काटी येथील तीळ व गुळ विक्रीसाठी आले आहे. तालुक्यातील ग्राम काटी येथे तिळाचे उत्पादन घेतले जात असून उसाचीही मोठ्या प्रमाणात लागवड होत असल्याने तेथेच गुळही तयार केला जातो. काटी येथीलच महिला त्यांच्याकडील किंवा गावातीलच शेतकऱ्यांकडून तीळ खरेदी करून गोंदियात विक्रीसाठी दुकाने लावत असल्याचेही विक्रेत्या महिलांनी सांगीतले.