यंदा आंब्याला मुकली गावरान अमराई
By admin | Published: April 9, 2016 02:05 AM2016-04-09T02:05:34+5:302016-04-09T02:05:34+5:30
जवळील परिसरात अनेक लहान-मोठ्या अमराईच्या बागा आहेत. गावातही आम्रवृक्ष असून गावालगतच्या अमराई हिरव्यागार दिसतात.
उत्पादनच नाही : आंब्यांच्या चवीपासून दुरावणार नागरिक, फळांचा राजा मिळणे कठीण
बाराभाटी : जवळील परिसरात अनेक लहान-मोठ्या अमराईच्या बागा आहेत. गावातही आम्रवृक्ष असून गावालगतच्या अमराई हिरव्यागार दिसतात. पण त्या अमराईतील वृक्षांना आंबे लागल्याचे दिसतच नाही. त्यामुळे यंदा आंब्याविना अमराई पोरखी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
तांदूळ व तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात डोंगराळ भाग आहे. हा भाग निसर्गाने नटलेला व पानाफुलांनी बहरलेला आहे. डोंगराळ भागात अनेक प्रकारची झाडे असून आयुर्वेदिक औषधी वनस्पतीसुद्धा आहेत. तसेच आम्रवृक्षसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यंदा फळांचा राजा आंबा दुर्मिळ झाल्याचे दिसून येत आहे.
यंदा सन २०१६ लागताच हवा, वादळवारा, पाऊस व गारपिटी यामुळे आम्रवृक्षांना येणारा बहर आधीच गळून पडला. हिरवी पालवीसुद्धा योग्यरीत्या फुटली नाही. पाने, फुले नाहीत तर फळ कुठून लागणार. हा प्रकार निसर्गाच्या कोपामुळे घडला. बऱ्याचवेळी वादळी वाऱ्यामुळे आम्रबहर झडून गेला. त्यामुळे यंदा आंब्यांचे उत्पादन होणार नसून नागरिकांना चाखायलासुद्धा आंबे मिळणे कठिण झाले आहे. गावरान आंब्यांचे उत्पादन नसल्याने बाहेरील आंबे महागणार असून अधिक किंमत मोजून ते खरेदी करावे लागण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.
गावरान अमराईचे दृश्य पाहिले तर किव येणाऱ्यासारखे चित्र दिसते. अमराई आंब्याविना पोरकी दिसते. तिचे सौंदर्यच हरवल्यागत झाले आहे. कोकिळेचा मधूर आवाज नाही, पक्ष्यांची किलबिल नाही, गर्द सावली दिसत नाही. रस्तासुद्धा मरमटला दिसतो. अमराईत खेळणारी मुलेसुद्धा दिसत नाही. अमराई सर्वांनिच मुकल्याचे वास्तव चित्र आहे. ही निसर्गाची किमया की कोप, असा सवाल अमराईचे मालक करतात.
लोणच, पन्हा, आमरस, खुला हे सर्व यंदा मिळणार नाही. तर आंब्यांच्या घुया एकत्र करून, वाळवून, नंतर त्यांना विकून मिळणाऱ्या रोजगारावरही संक्रांत आली आहे. यंदा फळांच्या राजाच्या अभावाने अनेक समस्या उद्भवत आहेत. रोजगार, आमरसाची चव व विविध मिळणारे पदार्थ, हे मिळणार नाहीच. यावर्षी पळसफुले रोमांचकारी व आल्हाददायक वाटत होती तर आंबे मात्र बेपत्ता झाल्यासारखेच आहेत.
उन्हाळा ऋतूत जो आनंद गावरान अमराईत मिळायचा, तो हरवला आहे. अमराईतील खेळही हरपले. अमराईच्या सावलीत फिरणारे-बाळगणारे मुले-मुलीसुद्धा यंदा आंबे नसल्याने दिसून येत नाही. अन्यथा सुट्टीमध्ये मामाच्या गावाला येणारी मुले ही अमराईतच खेळायची, आंबे खायची. तो काळ, ते दिवस यंदा गहाळ झाले आहेत. काळ जसजसा आधुनिक होत आहे तसतसा अमराईतील खेळही हद्दपार होत आहे.
ग्रामीण भागात भर उन्हाचे चटके सहन करीत अमराईमध्ये फेरफटका मारत असताना असे चित्र यंदा साक्षात दिसून येत आहे. (वार्ताहर)