गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:04 PM2018-08-28T13:04:51+5:302018-08-28T13:05:14+5:30
कर्जमाफीच्या घोषणेला वर्ष लोटले तरी अद्यापही यातील घोळ संपलेला नाही. कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी न आल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी संकटात आले असून त्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कर्जमाफीच्या घोषणेला वर्ष लोटले तरी अद्यापही यातील घोळ संपलेला नाही. कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी न आल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी संकटात आले असून त्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली.
कर्जमाफीस जिल्ह्यातील ८७ हजार शेतकरी प्राप्त ठरले होते. यापैकी जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकानी ६२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफाची १४५ कोटी रुपयांची रक्कम जमा केली. याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि घोळ निर्माण झाल्यानंतर शासनाने त्यांची पडताळणीे करण्यासाठी ग्रीन, येलो, रेड असे विभाजन केले. ग्रीन यादीत समावेश असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाते. जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकाना जून महिन्यापर्यंत ९ ग्रीन याद्या प्राप्त झाल्या. यातील ६२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली. मात्र मागील दोन महिन्यांपासून उर्वरित २५ हजार शेतकऱ्यांचा समावेश असलेली दहावी ग्रीन यादी महाआॅनलाईकडून अद्यापही बँका आणि निबंधक कार्यालयाला प्राप्त झाली नाही.
जुने माफ होईना अन नवीन मिळेना
कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शासनातर्फे रक्कम भरुन त्यांचे खाते शून्य केले जाणार आहे. खाते शून्य झाल्यानंतर शेतकऱ्यांना नवीन पिक कर्जाची उचल करता येणार आहे. मात्र खरीप हंगाम अर्धा संपत येत असताना खाते शून्य झाल्याने नवीन पिक कर्ज मिळण्याची अडचण झाली. तर शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम भरल्यास त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. जुने कर्जमाफ होत नसल्याने नवीन पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
सावकारांनी वाढविलेला व्याजदर
ऐन खरीप हंगामात कर्जमाफीच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतकऱ्यांना उधार उसनवारी करुन हंगाम पूर्ण करावा लागत आहे. यामुळे बरेच शेतकरी सावकारांकडे जात असून ते याचा फायदा घेत १० ते १२ टक्के व्याजाने पैसे देत असल्याची माहिती आहे.
याद्या लांबविण्याचे कारण काय
कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जून महिन्यापर्यंत नियमित आल्या. मात्र त्यानंतर मोठे अंतर पडले आहे. याद्या लांबविण्यामागे राजकीय हेतू असल्याची चर्चा आहे. बँकाचे अधिकारी यावर अधिक बोलण्यास तयार नाही. त्यामुळे याद्या लांबविण्याचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे.
महाआॅनलाईनकडून बँकाना अद्यापही दहावी ग्रीन यादी प्राप्त झाली नाही. त्यामुळे जवळपास २५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. याद्या प्राप्त होताच रक्कम जमा केली जाईल.
- सुरेश टेटे, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा बँक गोंदिया.
कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी अद्यापही आली नाही. काही तांत्रिक अडचणीमुळे याद्यांना विलंब होत असल्याची माहिती आहे.
अनिल गोस्वामीे, प्रभारी उपनिबंधक गोंदिया.