यंदा लागणार ‘माहेरची झाडी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:41 AM2018-06-23T00:41:43+5:302018-06-23T00:42:24+5:30
वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना समजून यंदा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र शासनाने १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना समजून यंदा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र शासनाने १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. वृक्षारोपनाला सामाजिक टच देऊन जन्माला आलेली बालके, तरूणांचे झालेले विवाह, गावातील तरूणांना लागलेली नोकरी, दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांच्या उत्साहाला द्वीगुणीत करण्यासाठी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. गावातील कन्या विवाह होऊन बाहेर गेल्या त्यांचा संसार फळासारखा बहरावा यासाठी त्या कन्यांसाठी ‘माहेरची झाडी’ असे संबोधण्यात येणार असून पालकांच्या हस्ते रोपटे लावले जाणार आहेत. नववधूंना माहेरच्यांनी रोपटे देऊन त्यांना आशिर्वाद दिले जाणार आहे.
महाराष्ट्रातील वनक्षेत्र २० टक्यावरून ३३ टक्क्यावर नेण्यासाठी हरित महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमामुळे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. १ जुलै रोजी करण्यात येणाऱ्या या वृक्षारोपणाला वृध्दीगंत करण्यासाठी शासनाने यंदाचे वृक्षारोपण कुणा-कुणाच्या हातून करावे यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. ग्रामसेवकांनी गावातील लोकांची या पाच मुद्याच्या आधारावर माहिती गोळा करून १ जुलै ला त्यांच्या हातून वृक्षारोपण करावे. सभापती, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
१ जुलैला वृक्षदिंडी काढून वृक्षदिंडीत गावकरी मोठ्या संख्येत सहभागी करून घेण्याचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राजेश बागडे यांनी २० जून रोजी जिल्ह्यातील सर्व खंडविकास अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
५ लाख ७२ हजार खड्डे तयार
१ जुलै रोजी जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायती वृक्षारोपण करणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम करण्यात आले. गोंदिया तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खड्डे खोदण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. आमगाव तालुक्यात ६२ हजार ७००, अर्जुनी-मोरगाव ७७ हजार, देवरी ६० हजार ५००, गोरेगाव ६० हजार ५००, सालेकसा ४६ हजार २००, सडक-अर्जुनी तालुक्याने ६९ हजार ३००, तिरोडा तालुक्यात १ लाख ४ हजार ५०० खड्डे खोदले. या सात तालुक्यांनी १०० टक्के खड्डे खोदले. तर गोंदिया तालुक्याला १ लाख १९ हजार ९०० खड्डे खोदण्याचे उद्दीष्ट असताना केवळ ९२ हजार खड्डे तयार केले आले आहे.
या पाच मुद्यांवर होणार वृक्षारोपण
शुभेच्छा वृक्ष : वर्षभरात गावात जन्माला आलेल्या बालकांना शुभेच्छा म्हणून त्या घरातील लोकांनी रोपटे लावावे व त्याचे जतन करावे.
शुभमंगल वृक्ष: वर्षभरात गावात ज्या तरूणांचे विवाह झाले त्या तरूणांनी वृक्षारोपण करून त्या रोपट्यांचे संवर्धन करावे.
आनंद वृक्ष : दरवर्षी गावातील दहावी, बारावीतून विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यांनी वृक्षारोपण करावे, तसेच वर्षभरात नोकरीवर लागलेले तरूण-तरूणी यांनी वृक्षारोपण करावे.
माहेरची झाडी : गावात वर्षभरात विवाह झालेल्या कन्येच्या माहेरच्या लोकांनी फळझाडांची रोपे देऊन मुलींना ती रोपटे लावण्यास व त्यांचे संगोपण करण्यास बाध्य करणे, रोपटे देऊन शुभार्शिवाद देण्याचा संकल्प आहे.
स्मृति वृक्ष: वर्षभरात निधन झालेल्या गावातील व्यक्तीच्या कुटुंबाना रोपटे देऊन त्यांना श्रध्दांजली म्हणून रोपटे लावावे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी वृक्षारोपण करावे.