शाळाबाह्य मुलांसाठी शिक्षकांची तळमळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:06 PM2019-07-17T22:06:26+5:302019-07-17T22:06:51+5:30
एकही मुल शाळाबाह्य व शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने शिक्षणाचा हक्क कायदा लागू केला आहे. याचतंर्गत तालुक्यातील ठाणा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : एकही मुल शाळाबाह्य व शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने शिक्षणाचा हक्क कायदा लागू केला आहे. याचतंर्गत तालुक्यातील ठाणा येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ठाणा येथील मुख्याध्यापक नरेंद्र बिसेन, शिक्षक कुवरलाल कारंजेकर, शशीकला प्रधान, मनिष शरणागत, गौरीशंकर पटले, गीता साठवणे, वैशाली बंसुले, अनिता मानकर व गटसाधन केंद्रातील भुमेश कटरे, वश्ष्ठि खोब्रागडे, सुनील बोपचे, उर्मिला वैद्य, शारदा जिभकाटे, हेमकांता कटरे, केंद्रप्रमुख हरदुले या शिक्षकांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम परिसरात सुरू केली होती. या दरम्यान पालकांच्या मजुरी व्यवसायाने स्थलांतरीत वास्तव्याने शाळा बाह्य ठरलेली मुले आढळली. स्थलांतरीत असलेले रवि सोनवाने हे कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्याला राहत असून आपल्या उपजिविकेला प्रथम प्राधान्य देताना आढळले. परंतु त्यांची मुलगी दिपीका आणि दिव्या या दोघेही शिक्षणापासून वंचित होत्या. मुलींची शिक्षणाची आवड असताना मात्र त्या शिक्षण घेण्यासाठी शाळेची पायरी ओलांडली नव्हती.शासनाच्या शैक्षणिक धोरणाची दखल घेत या दोन्ही मुलीना शाळेत प्रवेश देण्यात आला.
त्यांनी प्रथमच पाहिली शाळा
कुटुंबाच्या उदरनिर्वाह करीत सतत मिळेल त्या मजुरी करिता स्थलांतरण करावे लागत असल्याने मुलांच्या भविष्याचा आणि शिक्षणाचा अंदाज आला नाही. मात्र शिक्षकांच्या पुढाकारामुळे दोन्ही बहिणी शाळेत दाखल झाल्याने त्यांना शिक्षणाची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया वडील रवि सोनवाने यांनी दिली. तर मुलींनी आई-वडील यांच्या शिवाय आश्रय नसल्याने शिक्षणाची ओढ असताना त्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे सांगितले.