मालमत्ता कर वसुलीकरिता तिरोडा नगर परिषदेने कसली कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:26 AM2021-03-14T04:26:31+5:302021-03-14T04:26:31+5:30
बिरसी-फाटा : मागील अनेक वर्षांपासून थकीत मालमत्ता कर भरण्याबाबत अनेकदा मागणी करूनही मालमत्ताधारकांनी कर न भरल्यामुळे १० मार्चपासून तिरोडा ...
बिरसी-फाटा : मागील अनेक वर्षांपासून थकीत मालमत्ता कर भरण्याबाबत अनेकदा मागणी करूनही मालमत्ताधारकांनी कर न भरल्यामुळे १० मार्चपासून तिरोडा नगर परिषदेतर्फे मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अशात पहिल्याच दिवशी ७४ लाख रुपयांचा कर वसूल झाला आहे.
तिरोडा नगर परिषदेतील मालमत्ताधारकांकडे मागील ५-७ वर्षांपासून सुमारे दोन कोटी ३४ लाख रुपयांचा कर थकला आहे. थकीत कर भरण्याबाबत या मालमत्ताधारकांना सूचना देण्यात आली असतानाही त्यांनी कर भरला नाही. त्यामुळे तिरोडा नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना मेंढे यांच्या नेतृत्वात १० मार्चपासून मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम छेडण्यात आली आहे. जास्तीतजास्त कर वसुलीकरिता १० मार्च रोजी मुख्याधिकारी मेंढे यांच्यासह नगर परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कंवरलाल वॉर्ड व अशोक वॉडातील थकबारीदारांची मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू केली.
विशेष म्हणजे, नगर परिषदेेने कठोर पाऊल उचलताच मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ७४ लाख रुपयांचा कर जमा झाला. यामुळे आता ही मोहीम सतत सुरू राहणार आहे. अशात आता थकबाकीदारांनी त्वरित आपला मालमत्ता कर जमा करून जप्तीच्या कारवाईपासून वाचावे, असे मुख्याधिकारी मेंढे यांनी कळविले आहे.