तिरोडा पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 01:56 PM2024-09-04T13:56:05+5:302024-09-04T13:56:47+5:30
१९ दारू अवैध दारू विक्रेत्यांना पकडले : ६.६२ लाखांचा माल केला जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : पोळा, गणेशोत्सव, ईद-ए- मिलाद सणानिमित्ताने रविवारी (दि.१) अवैध धंद्यांवर विशेष मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत अवैध दारू विक्रेत्यांवर धाड टाकून एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोहा सडवा व दारू असा एकूण सहा लाख ६२ हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
सोमवारी व मंगळवारी जिल्ह्यात पोळा साजरा केला जाणार असून त्यानंतर शनिवारी (दि.७) गणरायाचे तर मंगळवारी (दि.१०) गौरींचे आगमन होणार आहे. तसेच १६ सप्टेंबर रोजी ईद असून हे सण-उत्सव शांततेत साजरे व्हावे यासाठी पोलिस विभागाकडून अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली जात आहे. अशातच तिरोडा पोलिसांनी रविवारी (दि.१) अवैध दारू विक्रेत्यांवर धाडसत्र राबविले. यामध्ये नसीमा अखोल पठाण, रोशनबी इसराईल शेख, ललीता मनोज बरीयेकर, वनमाला भीमराव झाडे, अरुणा संजय बरीयेकर, शाबीर रहीम खाँ पठाण, आशिक सफो शेख, दिलीप घनश्याम बरियेकर, सुखबंता बाबुराव बरीयेकर, धर्मेंद्र कुवरदास बिंझाडे, पुस्तकला प्रकाश छिपये, माया प्रकाश बरीयेकर, शीला विनोद खरोले, आशा राजेंद्र भोंडेकर, प्रल्हाद जीवतराम तांडेकर, पूर्णा जीवतराम तांडेकर, कमलेश पन्हालाल तांडेकर, केवल प्रभुदास टेकाम, चेतन छगनलाल जनबंधू यांचा समावेश असून त्यांच्याकडून सात हजार ४०० किलो सडवा मोहापास रसायन आणि हातभट्टी ३८ लिटर दारू असा एकूण सहा लाख ६२ हजार २०० रुपयांचा माल जप्त करून मौक्यावर नष्ट करण्यात आला. या सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमित वानखडे यांच्या नेतृत्वात पथकाने कारवाई केली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक जांभुळकर, पोलिस उपनिरीक्षक काळे तसेच इतर पोलिस कर्मचारी सहभागी होते.