तिरोडाचे एसडीओ कार्यालय ‘बंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:31 AM2018-06-02T00:31:36+5:302018-06-02T00:31:36+5:30
येथील उपविभागीय कार्यालय (एसडीओ) शुक्रवारी (दि.१) दिवसभर बंदच होते. मात्र सदर कार्यालय का बंद ठेवण्यात आले याची कसलीही सूचना कार्यालय परिसरात नसल्याने आपल्या विविध कामांसाठी आलेले नागरिक तासनतास कार्यालय उघडण्याची वाट बघत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : येथील उपविभागीय कार्यालय (एसडीओ) शुक्रवारी (दि.१) दिवसभर बंदच होते. मात्र सदर कार्यालय का बंद ठेवण्यात आले याची कसलीही सूचना कार्यालय परिसरात नसल्याने आपल्या विविध कामांसाठी आलेले नागरिक तासनतास कार्यालय उघडण्याची वाट बघत होते.
विशेष म्हणजे, उपविभागीय कार्यालयातील एक महिला कर्मचारीसुद्धा कार्यालय परिसरात येवून कार्यालय उघडण्याची प्रतीक्षा करीत होती. त्यामुळे इतर नागरिकही काही वेळात कार्यालय उघडेल अशी आशा बाळगून होते. मात्र दुपारचे तीन वाजूनही कार्यालय उघडलेच नाही. त्यामुळे कामासाठी आलेल्या शेतकरी व नागरिकांनी परतीचा मार्ग धरला.
या प्रकाराबाबत उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे यांच्या भ्रमणध्वीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. तर तहसीलदार रामटेके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गुरूवारी (दि.३१) मतमोजणी असल्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत उपविभागीय अधिकारी व आम्ही सर्व भंडारा येथेच आहोत. तहसील कार्यालय सुरू असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र उपविभागीय कार्यालय का बंद ठेवण्यात आले, याची माहिती ते देवू शकले नाही.
नागरिकांना अकारण त्रास होवू नये यासाठी कार्यालय का व कोणत्या दिवशी बंद ठेवण्यात येईल, याची आगाऊ सूचना कार्यालय परिसराच्या बाहेरील फलकावर लावणे गरजेचे असते. मात्र संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अशी कोणतीही सूचना फलकावर लावण्यात आली नाही. तब्बल दिवसभर कार्यालय बंद ठेवून कामासाठी आलेल्या नागरिकांचा संपूर्ण दिवस अकारण खराब करण्यात आला. परिणामी सदर दिवशी त्यांचे कोणतेही काम होऊ शकले नाही.