तिरोडा तालुक्यात १०,७७९ घरकुलांची कामे अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:29 AM2021-03-05T04:29:05+5:302021-03-05T04:29:05+5:30
विजय खोब्रागडे बिरसी फाटा : स्वतःचे हक्काचे एक घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी शासनही योजनांच्या माध्यमातून सहकार्य ...
विजय खोब्रागडे
बिरसी फाटा : स्वतःचे हक्काचे एक घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी शासनही योजनांच्या माध्यमातून सहकार्य करते. मात्र योजना राबविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हेलपाटे मारण्याची वेळ गरीब गरजू नागरिकांवर येते. सन २०१६-१७ ते २०२०-२१च्या आढावा बैठकीनुसार प्रधानमंत्री, रमाई व शबरी आवास योजनेंतर्गत तब्बल १०,७७९ घरकुलांचे काम तिरोडा तालुक्यात अपूर्ण असून, केवळ ३४९८ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.
सन २०१६-१७ ते २०२०-२१ या दरम्यानच्या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १०,३४४ घरकुलांचे काम अपूर्ण आहे, तर सन २०१६-१७ ते २०१९-२० मध्ये रमाई आवास योजनेंतर्गत ३७६ व शबरी आवास योजनेंतर्गत ५९ घरकुलांचे काम अपूर्ण आहे. वर्ष २०१८-१९ मधील रमाई आवास योजनेच्या १८१ पात्र प्रस्तावांना डीआरडीएकडून अद्याप ऑनलाइन मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर सन २०१९-२०मध्ये ३६४ प्रस्ताव नव्याने सादर झाले आहेत. सन २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १३,४७८ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यातील १३,३८२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, ९६ प्रस्ताव बाकी आहेत. ३०३६ घरकुलांचे काम पूर्ण झाले तर १०,३४४ कामे अपूर्ण आहेत. वर्ष २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षात रमाई आवास योजनेंतर्गत १३०० प्रस्ताव होते. त्यातील ८५४ प्रस्ताव मंजूर झाले, तर ४४६ प्रस्ताव बाकी आहेत. मंजूर प्रस्तावांपैकी ४३२ घरकुलांचे काम पूर्ण झाले, तर ३७६ घरकुलांचे काम अद्याप अपूर्ण आहे. तसेच शबरी योजनेंतर्गत मागील चार वर्षात १२२ प्रस्ताव होते. त्यातील ८९ प्रस्ताव मंजूर, तर ३३ प्रस्ताव शिल्लक आहेत. केवळ ३० घरकुलांचे काम पूर्ण तर ५९ अपूर्ण आहेत.
---
लाभार्थींनी सरळ माझ्याकडे तक्रार करावी
पंचायत समितीच्या घरकुल विभागात जर संबंधित अधिकारी-कर्मचारी घरकुलांची रक्कम लाभार्थींच्या खात्यात वळती करून देण्यासाठी अडचणी आणत असतील किंवा त्यासाठी त्रास देत असतील किंवा काही मागणी करीत असतील तर अशावेळी लाभार्थींनी सरळ माझ्याकडे तक्रार करावी.
- प्रकाश गंगापारी, खंडविकास अधिकारी