खबरदारी बाळगत तिरोडा तालुका झाला कोरोनामुक्त (तालुका पुरवणी मजकूर)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:20 AM2021-07-04T04:20:30+5:302021-07-04T04:20:30+5:30
दुसऱ्या लाटेतसुद्धा या तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, या दोन्ही लाटेत खबरदारी बाळगत हा तालुका कोरोनामुक्त झाला ...
दुसऱ्या लाटेतसुद्धा या तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, या दोन्ही लाटेत खबरदारी बाळगत हा तालुका कोरोनामुक्त झाला आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे थैमान सुरू झाले. आधी जनता कर्फ्यू, मग लॉकडाऊन, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोना वाढीचा उच्चांक आणि आता कोरोनाची दुसरी लाट या आजवरच्या प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत. तिरोडा तालुक्यातसुद्धा कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच गेली. सन २०२० पासून जगात कोरोनाने धुमाकूळ घातला. लोक भीतीने सैरभैर झाले. सगळे जनजीवन विस्कळीत झाले. लोकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. छोटे व्यापारी, कारागीर, कामगार, व्यापारी सारेच यात भरडले गेले. रोजगार नसल्यामुळे लोक चलबिचल झाले आहेत. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. बेकारी निर्माण झाली. कोरोनामुळे एकाच कुटुंबातील काही व्यक्तींचा मृत्यू होतो, तर दुसरीकडे सारे कुटुंब दवाखान्यात भरती होत होते. अशा परिस्थितीत लोकांनी हेवेदावे विसरून माणुसकीच्या धर्माने एकमेकांना मदत केली. लोकांच्या हितासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येत साथ दिली. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी शासन, अधिकारी वर्ग, महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य कर्मचारी फक्त यांचीच जबाबदारी आहे असे समजून चालणार नाही. ही जबाबदारी प्रत्येकाची आहे असे समजून सर्वांनी एकत्रित हातात हात घालून काम केले पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू आम्ही लढणार... आम्ही जिंकणार. या महामारीच्या विरोधात सर्वांनी मिळून आपला लढा दिला पाहिजे. जिंकण्याकरिता आपल्याला लढावेच लागेल आणि परिस्थितीनुसार बदलावेच लागेल. कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. मागील दीड वर्षाच्या कालावधीत तिरोडा तालुक्यात ४०९२ कोरोनाबाधित आढळले, तर ७६ बाधितांचा मृत्यू झाला. मात्र, आता तालुका कोरोनामुक्त झाला आहे. याचे संपूर्ण श्रेय तिरोडा तालुक्यातील जनता आणि आरोग्य यंत्रणेला जाते.
....................
कामाचे बदलले स्वरूप
आज खासगी कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावावर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगारांसाठी ही उपाययोजना अमलात आणली आहेत. आश्चर्य वाटते ना? पण कोरोनाने हा प्रताप करून दाखविला आहे. महामारीच्या संकटकाळात विविध अडचणींना सामोरे जणाऱ्या उद्योगविश्वाने ‘वर्क फ्रॉम होम’ला आपलेसे केले आहे.‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना टेलिपर फॉर्मन्स पत्राच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या घरी त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे जोडले जाते. एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीच्या नियमांचा भंग केल्यास ताबडतोब त्याचा फोटो काढून पाठविण्यात येतो. त्यामुळे आपल्याला खोटे बोलता येत नाही. आता मोठमोठ्या कंपन्यांची कामे घरी बसूनच वर्क फ्राॅम होमद्वारे होत आहेत.
.......
ऑनलाईन शिक्षण प्रणाली
आज कोरोनाच्या प्रभावाने शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन आव्हान उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना ऑनलाईनच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन वाचन साहित्य, वर्तमानपत्रे, मासिके, स्पर्धात्मक परीक्षाचे मार्गदर्शन, तसेच करिअर मार्गदर्शन आदी आधुनिक मानसिक समाधान करण्याची वेळ आली आहे. ऑनलाईन शैक्षणिक अभ्यासक्रम यात टूलची माहिती देणे आता गरजेचे आहे.
...............
सेल्फ लर्निंग अप्लिकेशन :- गुगल क्लासरूम, गुगल फार्म, झूम अॅप, टेलिग्राम अॅप, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ई-मेल या माध्यमाच्या आधारे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मोबाईलच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले जाऊ शकते, तसेच कोणत्याही वाचन साहित्याची आवश्यकता असल्यास त्यांना अनेक समाजमाध्यमे व सर्च इंजिनची माहिती करून दिली जाते.
.............
कोरोनामुळे विवाह सोहळ्याचे स्वरूप बदलले
विवाह समारंभ मोठ्या थाटामाटात करण्याची पद्धत होती. काही नागरिक विवाहाला प्रतिष्ठा मानून लाखो रुपये विवाह समारंभासाठी खर्च करायचे. वेळ पडल्यास उधार, उसने, कर्ज अथवा शेती किंवा घर गहाण ठेवून आपला सामाजिक दर्जा श्रेष्ठ कसा आहे, हे दाखविण्याचा आटापिटा करायचे; परंतु कोरोनाने ही सर्व समीकरण बदलवूनच टाकली. १०० वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत विवाह समारंभाला परवानगी दिली आहे. भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ फौजदारी दंड संहिता १९७३ अन्वये आरोग्य विभागाद्वारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अनेक गोष्टींवर निर्बंध घातले आहे. लॉकडाऊनमुळे मानवाच्या गरजा कमी झाल्या. भव्यतेकडून लघुतमतेकडे वाटचाल होणार आहे. नवीन पिढीचा लग्न समारंभाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार, कुटुंब निर्मितीसाठी विवाह आवश्यक आहे. मुलांचे संगोपन, आर्थिक सहकार्य यासाठी विवाह गरजेचे आहे. यासाठी मोठा थाटमाट करून प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करून अर्थ नाही. या गोष्टीचा विचार व्हायला सुरुवात झाली आहे आणि नवीन पिढीने बदलत्या विवाह समारंभाला मान्य केले आहे. सध्या तरी ५० वऱ्हाड्यांसोबत लग्न समारंभ होत आहे आणि आटोपले जात आहे. आता समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, याचा विचार कोरोनाने दूर ठेवला आहे.
................
लॉकडाऊन काळात मदतीचे अनेक हात आले पुढे
कोरोनाच्या पहिल्या लाटेत तिरोडा तालुक्यात सर्वाधिक संसर्ग वाढला होता, तर लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, व्यवसाय व रोजगाराची सर्वच साधने ठप्प होती. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वाधिक हाल झाले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. मात्र, अशा कठीण परिस्थितीत तालुक्यातील अनेक सामाजिक, राजकीय संघटनांनी धावून येत मदतीचा हात दिला. अदानी फाऊंडेशननेसुद्धा गरजवंतांची उपासमार होऊ नये यासाठी त्यांना अन्नधान्याच्या किट वाटप करून मदतीचा हात दिला. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडले.
............
आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण
कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी अहोरात्र राबले. त्यांचे हे योगदान कधीही विसरता येणार नाही. या सर्व मंडळींनी कुटुंबांची पर्वा न करता अहोरात्र आरोग्य सेवेलाच प्राधान्य दिले. त्यामुळेच तिरोडा तालुका कोरोनामुक्त होण्यास मदत झाली. म्हणून कोरोना विरुद्धच्या लढ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
...........
पदोपदी झाले माणुसकीचे दर्शन
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यांतील व दुसऱ्या राज्यांतील अनेक मजूर तालुक्यात वास्तव्यास होते. हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले होते. अशात तालुकावासीयांनी आपल्या परीने जी मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान अनेक प्रसंगांत पदोपदी माणुसकीचे दर्शन झाले तेसुद्धा कधीही न विसरता येणारे आहे.