'वीर महेंद्र अमर रहे’च्या जयघोषाने निनादला तिरोडा तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 07:21 PM2022-03-25T19:21:05+5:302022-03-25T19:23:22+5:30
Gondia News अरुणाचल प्रदेशात तैनात असलेल्या महेंद्र भास्कर पारधी (३७) या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
गोंदियाः अरुणाचल प्रदेशात तैनात असलेल्या महेंद्र भास्कर पारधी (३७) या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
तिरोडा तालुक्यातील चिरेखनी येथील महेंद्र भास्कर पारधी (वय 37) भारतीय सैन्यात मराठा रेजिमेंटमध्ये मेजर (हवालदार) पदावर कार्यरत असताना अरुणाचल प्रदेश (डिब्रुगड) येथे पेट्रोलिंगदरम्यान मंगळवार, 22 मार्च रोजी शहीद झाला. या घटनेने अख्खा गोंदिया जिल्हा शोकसागरात. शहीद महेंद्रचे पार्थिव गुवाहाटी ते दिल्ली, दिल्ली ते नागपूर, नागपूर ते कामठी मुख्यालय व तिथून आज शुक्रवार, 25 मार्च रोजी तिरोडा तालुक्याच्या ग्राम विरसी (फाटा) येथे यावेळी हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. ‘वीर महेंद्र अमर रहे’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर निनादले होते.
ग्राम विरसी येथे काही वेळ वीर महेंद्रचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे माजी सैनिकांच्या वतीने श्रांद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मोटारसायकल रॅली व चारचाकी वाहनांच्या रांगेसह ही प्रेतयात्रा तिरोडा शहरातील सुकडी नाका येथे आली. तेथे उपस्थित मोठ्या जनसमुदायाने वीर महेंद्रला श्रद्धांजली अर्पण केली. मेरिटोरियस शाळेचे संस्थापक मुकेश अग्रवाल, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
सुकडी नाका ते करिश्मा चौक ते महात्मा गांधी पुतळा ते रानी अवंतीबाई चौक ते सी.जे. पटेल कॉलेजपर्यन्त रस्त्याच्या दुतर्फा वीर महेंद्रचे अंत्यदर्शन घेण्याकरिता मोठ्या संख्येने महिला-पुरुष व विद्यार्थ्यांची एकाच गर्दी उसळली होती. ही प्रेतयात्रा बघून सर्वांच्या हृदयात देशभक्ती संचारली होती. सर्वांनी ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली. तिरोडा शहर व ग्राम चिरेखनी व्यावसायिकांनी आपापली दुकाने काही वेळासाठी बंद ठेवली होती. सर्वांना वीर महेंद्रचे अंत्यदर्शन घेण्याचा ध्यास लागला होता. सर्वत्र एकाच जयघोष ऐकू येत होता. सर्वत्र पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
ग्राम चिरेखनीच्या प्रवेशद्वारातून ही यात्रा वीर महेंद्रच्या घरी पोहचली. तेथे आधीच हजारोंच्या संख्येने अंत्यदर्शनासाठी नागरिक उपस्थित होते. मिल्ट्री व पोलीस स्टाफ हजर होता. तेथे गावातील रितीरिवाजानुसार माल्यार्पण करून अंत्यदर्शन घेण्यात आले. त्यानंतर गाव प्रदक्षिणा घालण्यात आली व स्मशानभूमिकाकडे प्रस्थान झाले.
तिरोडा व ग्राम चिरेखनी येथे न भूतो न भविष्यती, अशी ही अंत्ययात्रा होती. चिरेखनी स्मशान भूमीवर हजारो लोकांच्या उपस्थितीत सलामी देण्यात आली. वीर महेंद्रच्या मुलांच्या हस्ते पार्थिवाला अग्नि देण्यात आली.
यानंतर झालेल्या शोकसभेत हेमंत पटले, माजी आ.दिलीप बंसोड, जिप सदस्य चत्रभुज बिसेन, जिप सदस्य पवन पटले, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमईवार, लक्ष्मीनारायण दूबे, मुकेश अग्रवाल, देवानंद शहारे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.