आठ दिवसांपासून तिरोडा शहराचा पाणीपुरवठा ठप्प ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:56 AM2021-02-28T04:56:37+5:302021-02-28T04:56:37+5:30
तिराेडा : शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प असल्याने ...
तिराेडा : शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागांतर्गत पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प असल्याने शहरवासीयांना उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पाण्याअभावी नागरिक वेजार झाले असून नगर परिषद किवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून शहरात पाणी पुरवठा होणार नसल्याचा कुठलीही सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे शहरवासीयांनी संताप व्यक्त केला आहे. शहरवासीयांना पुन्हा दाेन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पाण्यासाठी पुन्हा दोन दिवस भटकंती करावी लागणार आहे. तिरोडा शहरातील अदाजे ३५०० ग्राहकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे वैनगंगा नदीवरून पाणी पुरवठा करण्यात येतो. धापेवाडा उपसा सिंचन योजनेतंर्गत धरणाची दारे बंद केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीस पुरवठा होत नसल्याने तिरोडा शहराचा पाणी पुरवठा मागील आठ दिवसांपासून ठप्प आहे. त्यामुळे पाण्याअभावी नागरिक बजार झाले. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता सुनील भांडारकर यांना विचारणा केली असता त्यांनी धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या धरणाचे दरवाजे बंद केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीस पाणी पुरवठा होत नसल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे सांगितले. पण येत्या दोन दिवसात शहरवासीयांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
..........
ग्राहकांना पूर्वसूचना देण्याचा विसर
मागील आठ दिवसांपासून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात येत नसून याबाबतची कुठलीही पूर्वसूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने ग्राहकांना दिली नाही. त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.