आराेग्य गणविरांकडे तर बांधकाम टेंभरे यांच्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 05:00 AM2022-06-25T05:00:00+5:302022-06-25T05:00:01+5:30

जिल्हा परिषदेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केल्यानंतर १० मे रोजी जि. प. अध्यक्षपदी भाजपचे पंकज रहांगडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणविर यांची निवड करण्यात आली. तर समाजकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा सेठ तर महिला व बालकल्याण  सभापतीपदी सविता पुराम यांची निवड करण्यात आली होती.

To health Ganavirs and to construction Tembhare | आराेग्य गणविरांकडे तर बांधकाम टेंभरे यांच्याकडे

आराेग्य गणविरांकडे तर बांधकाम टेंभरे यांच्याकडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदाचे खाते वाटप मागील महिनाभरापासून लांबले होते. शुक्रवारी (दि. २४) खाते वाटपाचा मुहूर्त सापडल्यानंतर सर्वसाधारण सभेपूर्वीच खाते वाटप करण्यात आले. आरोग्य व शिक्षण सभापतीपद उपाध्यक्ष  यशवंत गणविर यांच्याकडे तर अर्थ व बांधकाम सभापतीपदी संजय टेंभरे तर कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी सोनू कुथे यांची नियुक्ती करण्यात आली. जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी हे खाते वाटप केले. 
जिल्हा परिषदेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केल्यानंतर १० मे रोजी जि. प. अध्यक्षपदी भाजपचे पंकज रहांगडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणविर यांची निवड करण्यात आली. तर समाजकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा सेठ तर महिला व बालकल्याण  सभापतीपदी सविता पुराम यांची निवड करण्यात आली होती. पण, अर्थ व बांधकाम, आरोग्य व शिक्षण आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती पदाचे खाते वाटप झाले नव्हते. जिल्हा परिषदेच्या नियमानुसार विषय समिती सभापतींची निवड  झाल्यानंतर त्याच दिवशी खाते वाटप केले जाते. पण, जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच तब्बल महिनाभरानंतर विषय समिती सभापतीपदाचे खाते वाटप करण्यात आले. २३ मे रोजी विषयी समिती सभापतींची निवड झाली होती. पण, त्यांना खाते वाटप झाले नव्हते, तर शुक्रवारी (दि. २४) सर्वसाधारण सभेचा मुहूर्त साधत अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी विषय समित्यांचे खाते वाटप केले. त्यानंतर अध्यक्षांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली. जि. प.मध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच सभा असल्याने यात सर्व सदस्यांना शपथ देण्यात आली. त्यानंतर जि. प.च्या विविध दहा समित्यांचे गठन करण्यात आले. ही पहिलीच सर्वसाधारण सभा असल्याने या इतर विषयांवर चर्चा करण्यात आली नाही. मात्र, जि. प.ची पुढील सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता असून, यात जि.प.तील काही अधिकाऱ्यांवर कार्यवाही होण्याची शक्यता आहे. 

अर्थ व बांधकाम भाजपकडेच 
- जिल्हा परिषद विषय समिती सभापतींच्या खाते वाटपाकडे राजकीय वर्तुळाचे आणि जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. जि. प.मध्ये अर्थ व बांधकाम आणि आरोग्य व शिक्षण हे दोन महत्त्वपूर्ण विभाग आहेत. त्यामुळे हे खाते कोणाला मिळते याचीच चर्चा होती. अखेर भाजपचे संजय टेंभरे यांच्याकडे अर्थ व बांधकाम तर राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणविर यांच्याकडे आरोग्य व शिक्षण खाते सोपविण्यात आले. 

आता होणार कारभाराला सुरुवात 
- जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. कोरोना आणि ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन वर्षे लांबणीवर गेल्या होत्या. त्यानंतर १० मे रोजी जि. प.मध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर प्रशासकराज संपुष्टात आला. मात्र, विषय समित्यांचे खाते वाटप रखडल्याने जि. प.च्या कारभाराला तशी सुरुवात झाली नव्हती. मात्र, २४ जून रोजी विषय समितीचे खाते वाटप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जि. प.च्या कारभाराला सुरुवात होणार आहे. 

 

Web Title: To health Ganavirs and to construction Tembhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.