तंबाखूमुळे ४९६ लोकांचे तोंड उघडत नाही
By admin | Published: May 31, 2017 01:10 AM2017-05-31T01:10:30+5:302017-05-31T01:10:30+5:30
तंबाखू, गुटखा, पान मसाला, बिडी, सिगारेट व हुक्का या व्यसनांमुळे कर्करोगासारखे आजार होत आहेत.
तंबाखूने ५० लोकांना कर्करोग : ११५ लोकांनी केला तंबाखूचा त्याग
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तंबाखू, गुटखा, पान मसाला, बिडी, सिगारेट व हुक्का या व्यसनांमुळे कर्करोगासारखे आजार होत आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे जगात दरवर्षी ५५ लाख तसेच भारतात १० लाख लोक मृत्यूच्या दारात जात आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनात गोंदिया जिल्हाही मागे नाही. जिल्ह्यात दोन हजार १९२ लोक तंबाखूच्या अधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यापैकी ४९६ लोकांचे तोंड तंबाखूमुळे उघडत नाही. तर तंबाखूमुळे ५० लोकांना कर्करोग झाला आहे. जिल्ह्यातील ११५ जणांनी तंबाखूचा त्याग केल्याची माहिती देण्यात आली.
शाळेत शिक्षकही विद्यार्थ्यांच्या समोरच खर्रा व गुटखा खात असतात त्यामुळे विद्यार्थीही त्यांचे अनुकरण करतात. टिव्हीवर काही सिनेमात सिगारेट पितांना दाखविले जात असल्यामुळे याचा परिणाम युवकांवर पडत आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या दंत विभागात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत वार्षीक अहवालानुसार गोंदिया जिल्ह्यात तंबाखू खाणाऱ्यांची आकडेवारी आहे. मोठ्या प्रमाणात लोक तंबाखूचे सेवन करतात परंतु जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे आलेल्या तंबाखू खाणाऱ्यांची आकडेवारी अत्यल्प आहे. केंद्र सरकार व जगतिक आरोग्य संघटनेच्या संयुक्त सर्वेक्षणानुसार तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये ४७.९० टक्के पुरूष व २०.५० टक्के महिलांचा समावेश आहे. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये पुरूषांचे प्रमाण २४.३० टक्के, तर महिलांचे प्रमाण २.९० टक्के आहे. ३२.९० टक्के पुरुष व १८.४० टक्के महिला धूररहित तंबाखूचे सेवन करीत आहेत. सर्वेक्षणानुसार १३-१४ वर्षातील १४.६ बालके तंबाखूचे व्यसन करतात. दररोज ५५०० मुले-मुली तंबाखूचे सेवन करतात. यात १७.८ टक्के मुले तर २५.८ टक्के मुलींचा समावेश आहे. १५ वर्षापेक्षा अधिक वयाचे तरूण-तरूणी गुटखा, पान मसाला, हुक्का, तंबाखू मिश्रित पान, दंत मंजन, पेस्ट यांच्या आहारी गेल्याची नोंद आहे.