आज नगर परिषद आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2016 01:53 AM2016-07-02T01:53:07+5:302016-07-02T01:53:07+5:30
नगर परिषदेच्या येत्या निवडणुकीला घेऊन जागांचे आरक्षण ठरविण्यासाठी आरक्षण सोडत शनिवारी (दि.२)
गोंदिया : नगर परिषदेच्या येत्या निवडणुकीला घेऊन जागांचे आरक्षण ठरविण्यासाठी आरक्षण सोडत शनिवारी (दि.२) दुपारी १२ वाजता नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीमुळे शहरातील जागांच्या आरक्षणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
येत्या डिसेंबर महिन्यात नगर परिषद सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असून निवडणुका येत आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने यंदा दोन सदस्यांचा एक प्रभाग अशी प्रभाग रचना केली आहे. या नव्या प्रभाग रचनेला घेऊन नगर परिषदा आपल्या कामाला लागल्या आहेत. तसेच नव्या प्रभाग रचनेनुसार शहरात आता २१ प्रभाग होणार आहेत. म्हणजेच यात दोन सदस्यांची भर पडणार आहे.
शिवाय नगर अध्यक्ष आता सदस्य संख्येच्या आधारावर न निवडता थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सदस्यांची संख्या वाढत असतानाच नगराध्यक्ष आता जनतेतून येणार व नगर परिषदेत प्रतिनिधींची संख्या वाढणार असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरिही प्रभागातील सदस्यांच्या आरक्षणाला घेऊन शहरवासीयांत संभ्रम व उत्सुकता आहे.
यासाठीच शनिवारी (दि.२) नगर परिषदेच्या सभागृहात आरक्षण सोडत होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या आदेशावरून यासाठी बैठक बोलाविण्यात आली आहे. या आरक्षण सोडतीनंतर कोणत्या वॉर्डात कोणत्या प्रवर्गासाठी जागा आरक्षीत होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. (शहर प्रतिनिधी)