आजची नवरी लाजत नाही, कधी बुलेटवरून, तर कधी नाचत लग्नाला येते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 05:24 PM2024-05-14T17:24:19+5:302024-05-14T17:26:56+5:30
लग्न पद्धतीच्या पारंपरिकतेला आधुनिकतेचा साज : डिजीटल पत्रिकेचेही फॅड
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन मानवी जीवनातही आमूलाग्र बदल झाले आहेत. दैनंदिन गरजांपासून ते अगदी लग्न सोहळ्यापर्यंत आधुनिकता आली आहे. आधुनिकतेच्या या दुनियेत लग्न पद्धतीतही बदल होत गेले आणि पूर्वी रडत, लाजत, डोक्यावर पदर घेऊन, खाली मान घालून लग्नाला येणारी नवरी मुलगी आता चक्क स्वतःच्याच लग्नात नाचत येण्याची 'फॅशन' आली आहे.
लग्न म्हणजे दोन कुटुंबांना एकत्र आणणारा सोहळा. मात्र, या सोहळ्यालाही आता 'ग्लॅमर' आले आहे. पूर्वी वधू किंवा वराकडील मंडळींना जास्त खर्च नको असे म्हणून थोडक्यात लग्न करण्याची परंपरा होती. दारातच मंडप घालून अंगणात जेवणाच्या पंगती वाढण्यात यजमानांना वेगळाच आनंद वाटत होता. मात्र, अलीकडे लग्नावर लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. लग्न ठरल्यानंतर आई-वडिलांचे घर सोडून दुसऱ्या घरी आपण जाणार याचे दुःख तिच्या मनात सलत असते. त्यामुळे लग्नसोहळा आयुष्यातील महत्त्वाचा सोहळा असला तरी मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद, काळजी आणि दुःखात विरलेला असतो. त्यामुळे लग्नाला येताना मुलगी लाजत, मान खाली घालूनच यायची. मात्र, अलीकडे त्यातही 'ग्लॅमर' आले असून, लाजत येणारी नवरी मुलगी चक्क वन्हाडी मंडळींमधून नाचत येण्याची 'फॅशन' वाढली आहे. यामध्ये वन्हाडी मंडळीही सहभागी होतात.
कधी बुलेट, तर कधी डोलीतून आगमन
■ घरची मंडळी नाचत - नाचत नवरी मुलीला लग्न मंडपात आणतात, तर कधी स्वतः मुलगीच बुलेटवरून लग्नासाठी येथे येते. यातील काही तर डोलीतून नवरीला आणतात.
मेंदी, हळदीत रंग
अलीकडे लग्नातील मेहंदी व हळदी समारंभाचे स्वरूप बदलले आहे. हजारो रुपये खर्च करून विशेष सजावट केली जाते. त्या दिवशी हिरवे- पिवळे कपडे (ड्रेस कोड) घालण्याची पद्धत रुढ झाली आहे.
कोरिओग्राफरला मागणी
लग्नात संगीतासाठी एक दिवस आरक्षित असतो. त्यासाठी गाणी सिलेक्ट करून त्यावर नाच फिक्स असतात. यासाठी आता खास कोरिओग्राफर बुक केले जात असून, त्यांच्याकडून त्या त्या गाण्यांवर नाच शिकला जातो.
डीजेची 'फॅशन'
वरातीसाठी बेंजो, ढोल-ता- शांपेक्षा डीजेला पसंती दिली जात आहे. केवळ वरातीलाच नाही तर हळदी, मेंदीलाही डीजेच लागतो. आपल्या पसंतीच्या गाण्यांवर नाचत गात जल्लोष केला जातो.