शौचालय बांधकामाला निधीचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 01:45 AM2016-06-10T01:45:59+5:302016-06-10T01:45:59+5:30
स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत शहरातील नागरी शौचालय बांधकाम अभियान राबविले जात आहे.
निधीची मागणी : १६०० शौचालयांचे काम सुरू
गोंदिया : स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत शहरातील नागरी शौचालय बांधकाम अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत नगर परिषदेने त्यांच्याकडे आलेल्या अर्जांमधील २२३५ अर्जांची पाहणी केली असून १६०० शौचालयांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र शासनाकडून निधी न मिळाल्याने उर्वरीत ६३५ शौचालयांचे काम रखडले आहे. यातून शौचालय बांधकामाला निधीचा अडसर येत असल्याचे दिसून येत आहे.
सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरिता शहरांना स्वच्छता आणि शहरांमधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. शहरांत राबविण्यात येणाऱ्या या नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पात्र लाभार्थी कुटूंबास वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन शौचालय तयार करवून घेतले जात आहेत. यासाठी नगर पालिका क्षेत्रातील वैयक्तीक शौचालय नसलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
यांतर्गत पलिकेकडे ३७४४ अर्ज आले होते. पालिकेला २७८१ शौचालय बांधकाम करावयाचे असून आलेल्या अर्जातील २२३५ अर्जांची पडताळणी व पाहणी करण्यात आली. मात्र यातील १६०० शौचालयांचे बांधकाम सुरू करण्यात आले असून त्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर यातील ८०० लाभार्थींना दुसरा हप्ता देण्यात आला असून ४०० लाभार्थींना पालिकेला द्यावयाचा तिसरा हप्ता देण्यात आला आहे. तर ९ जून पर्यंंत यातील ४३७ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती आहे.
असे असतानाही ६३५ अर्जदारांचे शौचालयांचे काम पेडींग पडून आहे. यासाठी लागणारा निधी पालिकेकडे नसल्याने हे काम खोळबंत चालले आहे. हे काम सुरू व्हावे यासाठी पालिकेकडून शासनाकडे १.६७ कोटींची मागणी करण्यात आली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास उर्वरीत शौचालयांचे बांधकाम सुरू होईल. (शहर प्रतिनिधी)