विशेष सभेत ठरणार शौचालयांचे अनुदान
By admin | Published: October 7, 2015 12:19 AM2015-10-07T00:19:04+5:302015-10-07T00:19:04+5:30
नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात वैयक्तिक शौचालय नसलेल्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
नागरी स्वच्छता अभियान : न.प.चा पूरक हिस्सा निश्चित होणार
गोंदिया : नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात वैयक्तिक शौचालय नसलेल्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यांना शासकीय अनुदान देऊन शौचालयांचे बांधकाम करवून घेतले जाणार आहे. बांधण्यात येणाऱ्या शौचालयांत केंद्र व राज्य शासनाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांचा पूरक हिस्सा देणे आवश्यक आहे. त्यानुसार पालिकेचा हा हिस्सा निश्चित करण्यात यावा यासाठी नगर पालिकेची विशेष सभा बुधवारी (दि.७) बोलाविण्यात आली आहे.
शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरिता शहरांमधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देऊन हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाकडून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहरांत राबविण्यात येणाऱ्या नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबास वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान देऊन शौचालय तयार करवून घेतले जात आहेत. त्यानुसार गोंदिया नगर परिषदेने जुलै महिन्यात वैयक्तिक शौचालय नसलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागविले होते.
यातील पात्र लाभार्थी कुटूंबास अनुदानाच्या रुपाने १२ हजार रूपये दोन हप्त्यातून दिले जाणार आहेत. यात केंद्र शासनाकडून चार हजार रूपये तर राज्य शासनाकडून आठ हजार रूपयांचा समावेश आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनाही पुरक हिस्सा देणे आवश्यक आहे. यातही वैयक्तिक शौचालय बांधकामात प्रत्येकी पाच हजार रूपये किमान तर सार्वजनिक शौचालयासाठी २५ हजार रूपये कमाल देण्यात यावे असे निर्देश आहेत. अशात उक्त कमाल मर्यादा गृहीत धरून प्रत्येकी किती अनुदान द्यावे, हे निश्चित करण्यासाठी बुधवारी (दि.७) पालिकेने विशेष सभा बोलाविली आहे. या सभेत पालिका त्यांचा पुरक हिस्सा ठरवून घेणार आहे. (शहर प्रतिनिधी)
गोंदिया न.प.कडे ९४ लाख जमा
नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाकडून नगर पालिकेला ९४ लाख १९ हजार रूपये देण्यात आले आहेत. प्राप्त निधीतून पात्र लाभार्थीला १२ हजार रूपये अनुदानस्वरूप शौचालय बांधकामासाठी दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त आता पालिकेला आपला हिस्सा भरावयाचा असल्याने पालिकेला १४ व्या वित्त आयोग निधीतून आपला हिस्सा द्यावयाचे निर्देश देण्यात आले आहेत.
पालिकेकडे शौचालयांचे ९०० अर्ज
शौचालय बांधकामासाठी पालिकेने वैयक्तिक शौचालय नसलेल्या नागरिकांकडून अर्ज मागविले होते. त्यासाठी वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार वैयक्तिक शौचालय नसलेल्या ९०० नागरिकांचे अर्ज पालिकेकडे आले. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. प्राप्त अर्जांचे सर्वेक्षण सुरू असून यातील पात्र अर्जदारांना योजनेचा पहिला हप्ता म्हणून सहा हजार रूपये देण्यात येणार आहेत.