हजारो प्रवाशांसाठी दोनच ठिकाणी शौचालय
By Admin | Published: May 27, 2016 01:43 AM2016-05-27T01:43:24+5:302016-05-27T01:43:24+5:30
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर गोंदिया रेल्वे स्थानक सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक म्हणून ओळखले जाते.
आदर्श स्थानकावरील वास्तव : सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या गोंदिया रेल्वेस्थानकात गैरसोय
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर गोंदिया रेल्वे स्थानक सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक म्हणून ओळखले जाते. या स्थानकातून दररोज २० हजार प्रवासी इतर ठिकाणांसाठी तिकीट घेतात तर तेवढेच प्रवासी इतर ठिकाणांवरून गोंदिया रेल्वे स्थानकात उतरतात. एवढ्या रेल्वे स्थानकावर केवळ दोनच ठिकाणी शौचालयांची (मूत्रालय) व्यवस्था असल्याने गोंदिया स्थानकावर महिला आणि वृद्धांची चांगलीच गैरसोय होत आहे. आदर्श म्हणून बिरूद लागणाऱ्या स्थानकावर या साध्या सोयी कधी होणार? असा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे.
गोंदिया रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफार्मवर एक शौचालय आहे. येथे तीन खोल्या असून पैसे देवून प्रवासी त्यांचा उपयोग करतात. ज्या प्रवाशांना ट्रेन पकडण्याची किंवा ट्रेनमधून उतरून लवकर जाण्याची घाई असते, ते या शौचालयांचा उपयोग कधीच करू शकत नाही. याचे कारण म्हणजे या शौचालयाचे ठिकाण एकदम वेगळ्या ठिकाणी असून सामान्य प्रवाशांना त्याबाबत माहितीच होत नाही. तसेच गोंदिया स्थानकावर उच्च श्रेणीतील प्रवाशांसाठी एक शौचालय आहे. ते आरक्षित लोकांसाठी असून प्लॅटफॉर्म क्रमांक ३-४ वर आहे. याचा उपयोग सामान्य प्रवाशांसाठी नाही. केवळ उच्च श्रेणीचे प्रवाशीच कसाबसा याचा उपयोग करतात. सात फलाटांपैकी केवळ दोन फलाटांवरच शौचालयांची सोय आहे. प्लॅटफार्म क्रमांक २, ५, ६ व ७ वर शौचालयांची सोयच नाही. अशाप्रकारे गोंदिया रेल्वे स्थानकावर जवळपास ४० हजार प्रवाशांसाठी शौचालयांची व्यवस्था अत्यल्प आहे.
नेहमी गोंदिया रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान राबविले जाते. २६ मे रोजीसुद्धा हे अभियान राबविण्यात आले, परंतु प्रवासी रेल्वे स्थानकावर घाण का करतात, याकडे रेल्वे विभागाने कधीच लक्ष दिले नाही. शक्यतो हेसुद्धा एक कारण होवू शकेल की गोंदिया रेल्वे स्थानकावर शौचालय व इतर सोयीसुविधा अत्यल्प आहेत. त्यामुळे प्रवासी घाण करण्यास घाबरत नाही. (प्रतिनिधी)
केवळ तीनच ठिकाणी मुत्रीघर
गोंदिया रेल्वे स्थानकावर केवळ तीनच ठिकाणी मुत्रीघरांची व्यवस्था करण्यात आली आहे. एक होम प्लॅटफार्मवर, जेथे शौचालय आहे तिथेच मुत्रीघराचीसुद्धा व्यवस्था आहे. याशिवाय प्लॅटफार्म क्रमांक ३ व ४ वर दोन्ही विपरित बाजूंकडे मुत्रीघराची व्यवस्था आहे. त्यात तीन-तीन खोल्या बनविण्यात आल्या आहेत. प्रवाशांची मोठी संख्या बघता ही व्यवस्था कितपत पुरेसी आहे, हा शोधाचा विषय आहे. याबाबत विचारणा केली असता प्लॅटफॉर्म-१ वर दोन्ही बाजूंकडे मुत्रीघर बनविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे प्लॅटफार्म क्रमांक २, ५, ६ व ७ वर शौचालय तर नाहीतच, पण मुत्रीघरही नाही. शिवाय प्लॅटफार्म-२ ची लांबी वाढण्यिाचे कार्यसुद्धा प्रलंबितच आहे.
- कर्मचाऱ्यांची स्वच्छतेची शपथ
गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात गुरूवारी (दि.२६) सकाळी ९.३० वाजता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दरम्यान शेकडो रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. घाण करणार नाही आणि करू देणार नाही, अशी ती शपथ होती. दरवर्षी १०० तास म्हणजे प्रत्येक आठवड्यात दोन तास श्रमदान करण्याची शपथसुद्धा त्यांनी घेतली.
१६ ते ३१ मे दरम्यान रेल्वे विभागाने स्वच्छतेचा अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअंतर्गत २६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता गोंदिया रेल्वे स्थानक भवन, स्थानक परिसर व जवळील क्षेत्रात स्वच्छता अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला. सिनियर डीएमई प्रदीप कांबळे, लोको इन्स्पेक्टर गौतम चॅटर्जी, नितिन शर्मा, एन.के. भोंडेकर, एल.बी. पटले, बी. पटले, स्थानक व्यवस्थापक एच.ए. चौधरी, कमर्शियल इन्स्पटेक्टर अरविंद शाह, गुड्स सुपरवायझर मुकेशकुमार, चीफ ओ.एस. मनमोहनसिंग, रूपाली धकाते, संजय बागडे, पार्सल सुपरवायझर बन्सोड, आरोग्य निरीक्षक गगण गोलानी व मोठ्या संख्यने रेल्वेचे कर्मचारी या अभियानात सहभागी झाले.
अभियानादरम्यान प्रदीप कांबळे यांनी स्थानक परिसरात लावलेल्या विविध स्टॉल्सवरील खाद्य पदार्थांच्या लेबलची तपासणी केली व त्यांच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक परिसरात साफसफाईची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी स्थानक परिसरात थुंकणे, घाण पसरविणाऱ्यांवर दंड आकारले जाते व दंडाची रक्कम वसूल केली जाते.