तेंदुपत्ता तुडाई हंगाम ‘फिका-फिका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 09:19 PM2018-04-22T21:19:51+5:302018-04-22T21:19:51+5:30
जिल्ह्यातील आठ तेंदूपत्ता युनिटची विक्री अद्याप झालेली नाही. या युनिटची विक्री करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असून येत्या सोमवारी (दि.२३) अंतीम लिलाव केला जाणार आहे. विशेष म्हणजे, वन विभागातील अधिकाऱ्यांना या लिलावातून काही अपेक्षा नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील आठ तेंदूपत्ता युनिटची विक्री अद्याप झालेली नाही. या युनिटची विक्री करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असून येत्या सोमवारी (दि.२३) अंतीम लिलाव केला जाणार आहे. विशेष म्हणजे, वन विभागातील अधिकाऱ्यांना या लिलावातून काही अपेक्षा नाही. मात्र ही परिस्थिती बघता यंदाचा तेंदुपत्ता तुडाईचा हंगाम ‘फिका-फिका’ राहणार असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात तेंदुपत्ता तुडाई व संग्रहण २८ युनिटच्या माध्यमातून केले जाते. या युनिटच्या लिलावात खरेदीदारांनी फक्त २० युनिट खरेदी करण्यातच रूची घेतली. परिणामी आठ युनिटचा लिलाव झालाच नाही.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विक्री झालेल्या या २० युनिटमधील १५ युनिटचेच करार खरेदीरदारांनी केले असून पाच युनिटचे करार अद्याप करण्यात आलेले नाही. अचानकच व्यापाºयांनी तेंदुपत्ता युनिट खरेदीत अरूची दाखविल्यामुळे वन विभागाचे अधिकारीही अचंभीत आहेत. यावरून तेंदुपत्ता खरेदी-विक्रीत यंदा वन विभाग व मजुरांना मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.
विशेष म्हणजे, यंदा लवकरच पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर दुसरीकडे उन्हाळा पूर्णपणे आपल्या रंगात आला आहे. असे असतानाही, आतापर्यंत १५ युनिटचे करार झाले आहेत.
अशात तेंदुपत्ता तुडाई कधी होणार व कधी संपणार असा प्रश्न पडत आहे. जर पाऊस लवकरच बरसला तर याचा तेंदुपत्ता तुडाईवर परिणाम पडणार. असे झाल्यास मजुरांना मोठे नुकसान होणार आहे.
तसेही तेंदुपत्त्याला मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कमी भाव मिळाला आहे. याचाही फटका मजुरांना सहन करावा लागणार आहे.
बोनसवरही होणार परिणाम
यंदा तेंदुपत्त्याला मागील वर्षाच्या तुलनेत कमी भाव मिळाला आहे. शिवाय युनिटही पूर्णपणे विकल्या गेलेले नाही. या दोन्ही बाबी यंदा परिणामकारक दिसून येत आहे. यात, मजुरांच्या बोनसवर तर परिणाम पडणारच शिवाय वन विभागाची तिजोरीही पाहिजे त्या प्रमाणात भरणार नसल्याचे दिसून येत आहे.