महर्षी गुप्ता जिल्ह्यात अव्वल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 05:00 AM2021-08-04T05:00:00+5:302021-08-04T05:00:02+5:30
बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. ३) दुपारी ४ वाजता जाहीर होणार असल्याने व कोरोनामुळे परीक्षा न घेता मूल्यमापनाच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे याकडे लक्ष लागले होते. बारावीनंतर खऱ्याअर्थाने करिअरला सुरुवात होत असल्याने जास्तीत-जास्त गुण घेऊन आपल्या आवडत्या शाखेत प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.३) जाहीर करण्यात आला. दरवर्षी निकालात आघाडी घेणारा जिल्हा यंदा शेवटच्या स्थानी आला. जिल्ह्याचा एकूण ९९.३७ टक्के निकाल लागला. येथील शांताबेन मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी महर्षी गुप्ता याने विज्ञान शाखेतून ९९.१७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकाविले, तर याच विद्यालयाचा आदित्य राहुलकर ९९.०० टक्के गुण घेऊन व्दितीय आणि अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थिनी भैरवी संजय पुस्तोडे हिने ९८.३३ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला आहे. यंदा परीक्षा न घेता मूल्यमापनाच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात आला. मात्र यात गोंदिया जिल्हा माघारल्याचे चित्र आहे.
बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. ३) दुपारी ४ वाजता जाहीर होणार असल्याने व कोरोनामुळे परीक्षा न घेता मूल्यमापनाच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे याकडे लक्ष लागले होते. बारावीनंतर खऱ्याअर्थाने करिअरला सुरुवात होत असल्याने जास्तीत-जास्त गुण घेऊन आपल्या आवडत्या शाखेत प्रवेश घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते. त्यामुळेच आपला पाल्य चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावा, अशी सर्व पालकांची इच्छा असते. यासाठीच तेसुद्धा वर्षभर मेहनत घेत असतात.
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण १८ हजार २५८ विद्यार्थी बसले होते. यापैकी १८ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक ९ हजार ५२७ विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते. यापैकी ९ हजार २३ विद्यार्थी (९८.९०) उत्तीर्ण झाले. कला शाखेचे एकूण ७ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७ हजार ४२४ विद्यार्थी (९९.८७) उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचे एकूण ९४५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ९४५ विद्यार्थी (१०० टक्के) उत्तीर्ण झाले.
तर व्होकेशनल शाखेच्या एकूण ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ३५२ विद्यार्थी (१०० टक्के) उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे जेव्हा प्रत्यक्षात परीक्षा घेण्यात आल्या, तेव्हा जिल्हा विभागात अग्रेसर होता. मात्र यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे मूल्यमापनाच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात आला, त्यात मात्र जिल्हा माघारला आहे. बारावीच्या एकूण निकालात मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या असून, ९९.४७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर ९९.२७ मुले उत्तीर्ण झाले.
सावित्रीच्या लेकीच सरस
- मंगळवारी जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे यंदाही जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत सावित्रीच्या लेकीच पुढे असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील एकूण ९२७३ विद्यार्थिनींंनी परीक्षा दिली. त्यापैकी ९२२४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून, त्याची टक्केवारी ९९.४७ एवढी आहे, तर एकूण ८९८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ८९२० उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ९९.२७ एवढी आहे. त्यामुळे निकालाच्या टक्केवारीत मुलींनी आघाडी घेतली आहे.
विज्ञान व वाणिज्य शाखेकडे वाढला कल
nजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे वाढत असल्याचे आता दिसून येत आहे. दरवर्षी विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असून, अशात त्यांच्या निकालाची टक्केवारीसुद्धा सुधारत आहे. यंदा बारावी विज्ञान शाखेचा निकाल ९८.९० टक्के, कला शाखेचा ९९.८७ टक्के, वाणिज्य शाखेचा १०० टक्के आणि व्होकेशनल शाखेचा १०० टक्के लागला आहे.
वाणिज्य व व्होकेशनल शाखेचा निकाल शंभर टक्के
- बारावीच्या निकालात यंदा वाणिज्य आणि व्होकेशनल शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून, सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचे ९४५ विद्यार्थी, तर व्होकेशनल ३५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
वाणिज्यमध्ये दीपेश, तर कला शाखेत ईशाने मारली बाजी
- मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात वाणिज्य शाखेतून नटवरलाल माणिकलाल दलाल कनिष्ठ महाविद्यालयाचा दीपेश नरेश कोडवानी ९६.८३ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून अव्वल ठरला, तर याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी ईशा किरणकुमार बिसेन हिने ९७.५० टक्के गुण घेऊ जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त केले. कला शाखेतून सर्वाधिक गुण घेऊन ईशाने मुलींमध्ये बाजी मारली आहे.