वादळी पावसाने बेरडीपार शाळेचे छत उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:51+5:302021-05-10T04:28:51+5:30
बिरसी : तिरोडा तालुक्यात शनिवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बेरडीपार खु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक ...
बिरसी : तिरोडा तालुक्यात शनिवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बेरडीपार खु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली.
शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळामुळे वडेगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या बेरडीपार खु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत उडाले. याची माहिती मिळताच सरपंच मिलिंद कुंभरे व केंद्रप्रमुख विलास डोंगरे यांनी तातडीने शाळेला भेट देऊन शासनास अहवाल पाठविला.
शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचे छप्पर पूर्णपणे उडाले. त्यामुळे शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक रेकॉर्ड, स्मार्ट टीव्ही, झेरॉक्स मशीन आदी साहित्य खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच अन्य साहित्याचेसुध्दा नुकसान झाले. शाळेच्या मागील भागात लावलेले सागवनाचे झाड शाळेच्या छप्परावर पडल्याने नुकसान अधिक नुकसान झाले. सरपंच मिलिंद कुंभरे, रमेश साठवणे, अमरकंठ ठाकरे, सहाय्यक शिक्षक ए. डी. बिसेन, जी. बी. रहांगडाले, नरेंद्र आगाशे यांनी रविवारी शाळेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. छप्पर उडाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने त्वरित निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.