पर्यटन संकुल विकासाची गाडी बैठकांपुढे सरकेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 09:13 PM2019-04-30T21:13:04+5:302019-04-30T21:13:42+5:30
येथील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुल परिसराचा विकास मागील चार वर्षांपासून रखडला आहे. पालकमंत्र्याच्या आढावा बैठकीच्या पुढे या पर्यटन संकुलाच्या विकासाची गाडी पुढे सरकतच नसल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : येथील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुल परिसराचा विकास मागील चार वर्षांपासून रखडला आहे. पालकमंत्र्याच्या आढावा बैठकीच्या पुढे या पर्यटन संकुलाच्या विकासाची गाडी पुढे सरकतच नसल्याचे चित्र आहे. ७ ते ८ कोटी रुपयाचा निधी मंजूर असूनही निविदा न काढल्याने कामे रखडली आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि पर्यटकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
२० जुलै २०१७ ला गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री व अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदार संघाचे आ. राजकुमार बडोले यांनी राष्ट्रीय उद्यानातील लॉगहट विश्रामगृहावर नवेगावबांध येथे राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुल परिसराच्या विकासासंदर्भात बैठक घेतली होती.
बैठकीला जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा पर्यटन समिती गोंदिया यांच्यासह वन विभाग, महसूल विभाग, वन्यजीव संरक्षण विभाग, पाटबंधारे विभाग, बांधकाम विभाग, वनविकास महामंडळ, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन संकुल परिसरातील ज्या स्थळांचा विकास करायचा आहे, त्या स्थळांची पाहणी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष उपस्थित अधिकाऱ्यांसह केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत थायलंडच्या धर्तीवर वन्यजीव विभागाच्या अनुसूची क्रमांक १ ते ५ मधील वन्यप्राणी वगळून प्राणी संग्रहालय उभारणे, शेगावच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारणे, प्रवेश द्वारापासून ते संकुल परिसरापर्यंत दुतर्फा शोभीवंत वृक्षाची लागवड करणे, गाव तिथे क्रीडांगण योजनेतून विशेष बाब म्हणून क्रीडांगण तयार करणे, इंटरप्रिटीशन हॉल, तलावा शेजारी बीच,हनुमान मंदिराच्या पायथ्याशी जलतरण तलाव, संजय कुटी परिसरात ३ किलोमीटरची मीनी ट्रेन, रोपवे तयार करणे, नावाजलेल्या व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मनोहर उद्यान, हीलटॉप गार्डन, वैभव गार्डन, हॉलीडे होम्स गार्डन यांचे नुतनीकरण व सुशोभीकरण, बालोद्यानचे पुनर्रजीवन,सध्या जीर्णवस्थेत असलेल्या रॉक गार्डन व कॉन्फरन्स हॉलचे पुनर्रजीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यासाठी ५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार डिसेंबर २०१७ पर्यंत याबाबत कुठलीही हालचाल किंवा विकास आराखडा तयार करण्याचे काम सबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले नाही.
पालकमंत्र्यांच्या आदेशाची दखल अधिकाºयांनी घेतली नाही. शेवटी नवेगावबांध फाऊंडेशनने भिक मांगो आंदोलनाचा पवित्रा घेऊन पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी आंदोलनाचा इशारा दिला. तेव्हा कुठे २०१८ मध्ये याबाबत शासन स्तरावर दखल घेऊन ४.९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
जिल्हा नियोजन समितीने १.२५ कोटी, वनविभागाकडून जवळपास दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला.
अधिकाऱ्यांचे वेळकाढू धोरण
या निधीतून प्रवेशद्वार, इंटरपिटीशन हॉल, संकुल परिसरातंर्गत व्यवस्थेत सार्वजनिक शौचालय,पार्कीग, नैसर्गिक पायवाट, अंतर्गत रस्ते दुरुस्ती, रस्ते, लॉन, गार्डं, पथरस्ता, बैठक व्यवस्था, जुन्या बगीच्यांचा जिर्णोध्दार, एडवेंचर स्पोर्ट, साहसी खेळ, जॉबीग बॉल, रोपवे, विश्रामगृह या विकास कामांवर हा ८ ते ९ कोटीचा मंजूर निधी खर्च करायचा आहे. निधी मंजूर होऊन ७ ते ८ महिन्याचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही याचे ई टेंडरिंग व प्रशासकीय मंजुरी न मिळाल्याने काम रखडले आहे.
विकास कामे त्वरित सुरू करा
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलातील विकास कामे त्वरीत सुरु करण्यात यावे, जिल्हा पर्यटन विकास समिती गोंदिया यांनी लक्ष देऊन ८ कोटी रुपयांच्या व दोन वर्षापूर्वी मंजूर झालेल्या १ कोेटी २० लाखाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देऊन ही कामे मार्गी लावावे, अशी मागणी नवेगावबांध गावकºयांनी केली आहे.
निधी प्राप्त होऊनही कामाला सुरुवात नाही
रोपवेकरीता आलेला निधी कोलू पहाडी ते जेटीपार्इंट रोपवेचा निधी मंजूर होऊनही वर्षभराचा कालावधी लोटला पण अद्यापही कामाला सुरूवात करण्यात आली नाही. हीलटॉप विश्रामगृहासाठी मंजूर झालेला १ कोटी २० लाख रुपयाचा निधी बांधकाम विभागाला २०१७ मध्ये हस्तांतरीत करुनही या विभागाने अद्यापही विश्रामगृहाच्या बांधकामाला सुरुवातच केली नाही.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन संकुलाचा विकास व्हावा, हा प्रामाणिक हेतू आहे. परंतु प्रशासकीय अधिकारी व या कामाशी संबंधीत विभागाचे अधिकारी पालकमंत्र्याच्या उद्देशाला हरताळ फासत आहेत. जिल्हा पर्यटन समिती राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यटन संकुलाच्या विकासाबाबत उदासीन आहे.
- रामदास बोरकर, सामाजिक कार्यकर्ते नवेगावबांध