नागझिरा अभयारण्यात सुरू आहे पर्यटकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:14 AM2021-01-13T05:14:39+5:302021-01-13T05:14:39+5:30
वडेगाव : पर्यटनासाठी आत गेल्यानंतर परतीच्या वेळेत उशीर झाला तसेच वाहनांची गती जास्त होती, अशी कारणे पुढे करून वन ...
वडेगाव : पर्यटनासाठी आत गेल्यानंतर परतीच्या वेळेत उशीर झाला तसेच वाहनांची गती जास्त होती, अशी कारणे पुढे करून वन कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांची लूट केली जात आहे. जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील मंगेझरी गेट येथे हा प्रकार सुरू असून पर्यटकांची लूट केली जात असल्याचा आरोप पर्यटकांनी केला आहे.
पर्यटकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नागझिरा अभयारण्याच्या मंगेझरी गेट येथून दुपारी प्रवेश करणाऱ्या पर्यटकांची जंगल सफारी सायंकाळी संपते. सायंकाळी वन प्रशासनाद्वारे येण्यास विलंब झाल्याचे सांगून पर्यटकांकडून दंड म्हणून १००० रुपयांची मागणी करण्यात येत असल्याची बाब पुढे आली आहे. पर्यटकांना पर्यटनादरम्यान जिप्सी चालक वा गाइड याबाबत कुठलीही पूर्वसूचना देत नाही. शिवाय चालक व गाइड स्वतःच्या सोयीनुसारच गाडी चालवीत पर्यटन करवीत असतात. याची कुठलीही पूर्वसूचना पर्यटकांना दिली जात नाही. गाडी गेटजवळ आल्यावर चालक व गाइड सरळसरळ त्या गेटच्या खालच्या छोट्या जागेतून बाहेर जाऊन वन कर्मचाऱ्यांच्या मागे जाऊन उभे राहतात. तर वनकर्मचारी जिप्सीची स्पीड जंगल नियमांपेक्षा अधिक होती, येण्यास विलंब झाला, अशी कारणे सांगून पर्यटकांकडून पैसे उकळत असल्याचा प्रकार सुरू आहे. यात लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे पर्यटक याचा विरोध करतात तेव्हा गेटवरील कर्मचारी १०००, ५०० व नंतर ३०० तरी द्या अशी मागणी करीत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी व पर्यटकांना न्याय देण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.
------------------------------
पर्यटकांत नाराजी व रोष
रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर निघून काही काळ निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्यासाठी नागरिकांचा कल सध्या वन पर्यटनाकडे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, मोठ्या संख्येत नागरिक नागझिरा अभयारण्यात पर्यटनासाठी जात असल्याचे दिसत आहे. त्यात मात्र पर्यटकांची खुद्द वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच अशी लूट होत असल्याने पर्यटकांत नाराजी दिसून येत असून चांगलाच रोष व्यक्त आहे.