भजनाने काढली गावात शाळाप्रवेश दिंडी
By admin | Published: June 30, 2017 01:28 AM2017-06-30T01:28:05+5:302017-06-30T01:28:05+5:30
शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या स्वागतार्थ प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. काही
पिंडकेपार/दे. येथील नाविण्यपूर्ण उपक्रम : विद्यार्थ्यांचे केले स्वागत व पुस्तक वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : शाळेच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या स्वागतार्थ प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. काही गावांत शिक्षणाच्या जनजागृतीसाठी प्रवेश दिंडी काढून पालकांत जागृती करण्यात आली.तर काही गावांत शाळेतच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र तालुक्यातील पिंडकेपार/दे. येथे भजनाने प्रवेश दिंडी काढण्यात आली. पिंडकेपारवासीयांच्या या नावीण्यपूर्ण उपक्रमाचे परिसरात कौतूक केले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवासाठी ग्रामीण भागातील काही शाळांनी विद्यार्थ्यांची रॅली काढली. काही शाळांत गावचे पदाधिकारी व विद्यार्थी गावात घोषवाक्य देत निघाले. अशा वेगवेगळ््या प्रकारच्या दिंड्या काढून पालकांत जनजागृती व विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र पिंडकेपार/दे. येथील गावकऱ्यांनी वेगळीच शक्कल लढवून प्रवेशोत्सवाचा आगळावेगळाच प्रयोग करून दाखविला.
पिंडकेपार/दे. येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नाविण्यपूर्ण उपक्रमाने दिंडी काढण्यात आली. सर्वात अगोदर नवागतांना पुष्पगुच्छ देण्यात आले. त्यानंतर गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या निरंकारी भजन मंडळ व दुर्गाबाई भजन मंडळ यांच्या संयुक्तवतीने गावात प्रवेश दिंडी काढण्यात आली. टाळ व ढोलकीच्या तालावर भजन गात भजनी गावात निघाले. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. एकच ध्यास गुणवत्तेचा विकास यावरील भजनाने विद्यार्थी दंग झाले होते.
याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना सरपंच प्रमिला घासले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कल्पना बागडे, उपाध्यक्ष पदमा राऊत, केंद्र प्रमुख इ.न.येळणे, कवडू कोल्हारे, सुखराम नाईक, यशवंत बागडे, शिवलाल राऊत, शाराजा कोल्हारे, अंजिरा धानगाये, कौशल्या धानगाये, भागरता येल्ले, मालती कोल्हारे, शारदा बावणे यांच्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेशसिंह कश्यप यांनी मांडले. संचालन यशवंत टेंभुर्णे यांनी केले. आभार चेतन उईके यांनी मानले.