बालकांसह युवकांनाही देणार जंतनाशक डोज
By Admin | Published: August 21, 2016 11:57 PM2016-08-21T23:57:55+5:302016-08-21T23:57:55+5:30
बालकांमध्ये कृमीची समस्या वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी २ सप्टेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिवसा पाळला जात आहे.
कृमीची समस्या : जिल्ह्यात ३.२४ लाख मुलांना देण्याचे उद्दिष्ट
गोंदिया : बालकांमध्ये कृमीची समस्या वाढत आहे. या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी २ सप्टेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिवसा पाळला जात आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावर जंतनाशक अभियानाचे आयोजन करण्यात आले असून यात जिल्ह्यातील १ ते १९ वर्षापर्यंतच्या ३ लाख २३ हजार ९७० मुलांना जंतनाशक डोज देण्याचे उद्धीष्ट देण्यात आले आहे.
आतापर्यंत अंगणवाडीच्या बालकांना जीवनसत्व अ दिले जात होते. पण पहिल्यांदा १ ते १९ वर्षाच्या मुलांनाही जंतनाशक डोज दिला जाणार आहे. राज्याच्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला सोडून उर्वरीत ३२ जिल्ह्यात या जंतनाशक अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत २५२६ शासकीय, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा, मनपा शाळा, खासगी अनुदानित शाळा व आश्रमशाळेच्या २ लाख १४ हजार ३०७ तर जिल्ह्यातील १६७९ अंगणवाडी-मिनी अंगणवाडीच्या एक लाख ९ हजार ६६३ बालकांना जंतनाशकाचा डोज दिला जाणार आहे.
अभियानात शाळाबाह्य मुला-मुलींचा समावेश आहे. १ ते २ वर्षातील बालकांना एल्बेंडाजोल ४०० एमजीची अर्धी टॅबलेट, तर यापेक्षा मोठ्या बालकांना एक टॅबलेट देण्यात येणार आहेत. अभियानासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी (आयसीडीएस), गटशिक्षणाधिकारी, शहर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग व आदिवासी विभागाचे या अभियानाला सहकार्य लाभणार आहे.
एनएफएचएस ४ च्या सर्वेक्षणानुसार राज्यात ५ वर्षातील ३४.४ टक्के बालकांचा विकास कुपोषणामुळे थांबला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एजेंसीद्वारे करण्यात आलेल्या सर्वेनुसार मातीपासून हागाणाऱ्या कृमी दोषाची टक्केवारी महाराष्ट्रात २७.५५ टक्के आहे. यामुळे शासनाने राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिवस वर्षातून दोन वेळा आयोजित करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
मारबतीच्या दिवशी कसे राबविणार अभियान?
येत्या २ सप्टेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिवसाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी तान्हा पोळा (मारबत) आहे. विदर्भात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत मोठ्या उत्साहात साजरी करतात. या दिवशी शाळांना सुटी असते. सोबतच राज्यात कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी संपाचे आवाहन केले आहे. यामुळे या अभियानावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. ७ सप्टेंबर रोजी मॉपअप दिवस ठेवण्यात आला आहे. या दिवशी जंतनाशक अभियानात डोज न पाजलेल्या बालकांना डोज देण्यात येणार आहे.
- कुपोषण व रक्ताची कमतरता
जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात १ ते १९ वर्षापर्यंतच्या ६८ टक्के बालक व युवकांच्या शरीरात कृमी दोष आढळतात. मातीमधील जंतूपासून हा आजार होतो. जगात २८ टक्के बालकांना कृमी दोष होण्याची शक्यता आहे. याचे प्रमुख कारण वैयक्तिक व परिसर अस्वच्छता आहे.
कृमी दोष संक्रमित दूषित मातीच्या संपर्कात आल्यावर होतो. बालकांना दीर्घकाळ कृमी दोष राहीला तर बालके कमजोर होतात. रक्ताचा अभाव व कुपोषणाचेही कारण त्यामागे आहे. बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास थांबतो.
भारतात ६ ते ५९ महिन्याच्या गटातील १० बालकांपैकी ७ बालकांना रक्त कमी असल्याचे लक्षात येते. ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक आहे. १५ ते १९ वर्ष वयोगटातील ५६ टक्के मुलींना व ३० टक्के मुलांना रक्ताची कमतरता असते.