जुन्या यार्डात व्यापारावर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:07 AM2017-08-15T00:07:25+5:302017-08-15T00:08:02+5:30
जुन्या बाजार समितीत अडत्यांना प्रवेश देण्यात आला असतानाच व्यापारावर मात्र बंदी लावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जुन्या बाजार समितीत अडत्यांना प्रवेश देण्यात आला असतानाच व्यापारावर मात्र बंदी लावण्यात आली आहे. येत्या १८ तारखेला पणन महामंडळाकडे सुनावणी असल्याने त्यातच चित्र स्पष्ट होणार असून, तोपर्यंत मात्र अडत्यांना बाजार समितीत वाहनही घेऊन जाता येणार नसल्याचा नवा नियम बाजार समिती प्रशासनाने लावला आहे.
जुन्या बाजार समितीतील व्यापार नव्या यार्डात स्थानांतरीत करण्याच्या विषयाला घेऊन बाजार समिती प्रशासन व अडत्यांमध्ये वाद सुरू आहे. अशातच बाजार समिती प्रशासनाने जुन्या बाजार समितीतील व्यापार नवीन यार्डात स्थानांतरीत केला.
या विषयाला घेऊन अडत्यांनी उच्च न्यायालयाकडून परवानगी घेत पणन महमंडळाकडे धाव घेतली होती. पणन महामंडळाने या विषयावर येत्या १८ तारखेला सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे अडते जुन्या बाजार समितीतच आपला कारभार चालवित होते.
असे असताना मात्र, शुक्रवारी (दि.११) सायंकाळपासून जुन्या बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कुलूप लावून अडत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. शनिवारीही (दि.१२) तोच प्रकार घडल्याने अडत्यांनी पणन महामंडळाच्या आदेशाची अवहेलना होत असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान पोलीस ठाण्यात अडते व बाजार समिती पदाधिकाºयांत चर्चा झाली व ठाणेदारांच्या मध्यस्तीने बाजार समिती प्रशासनाने शनिवारी (दि.१२) सायंकाळी प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले होते.
सोमवारी (दि.१४) मात्र अडते बाजार समितीत जाण्यासाठी आले असता त्यांना बाजार समितीत जाण्यास परवानगी देण्यात आली मात्र व्यापार करण्यास बंदी करण्यात आली असल्याचे अडत्यांनी सांगीतले. येत्या १८ तारखेला सुनावणी असल्याने तोपर्यंत जुन्या यार्डात अडत्यांना व्यापारावर बंदी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यादरम्यान कुणालाही बाजार समितीच्या आत दुचाकीनेही जाण्यास बंदी करण्यात आली असल्याचे दिसले. त्यामुळे आता येत्या १८ तारखेच्या सुनावणीत काय होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
१० ते ५ वाजतापर्यंतच प्रवेश
अडत्यांना प्रवेश व व्यापारावर बंदीचा हा वाद सुरू असतानाच बाजार समिती प्रशासनाने बाजार समितीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंतच प्रवेशद्वार उघडे राहणार असल्याचा नवा नियम लावल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी बाजार समितीचे द्वार कधीही बंद केले जात नव्हते. मात्र आता वेळेचे बंधन लावून अडत्यांना त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचे अडत्यांचे म्हणणे आहे.
शेतकºयांची मात्र फसगत
अडते व बाजार समितीच्या या वादात मात्र शेतकºयांची फसगत होत आहे. शेतकºयांचा माल बाजार समितीत पडून आहे, मात्र व्यापार बंद असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजार समितीत माल पडून असल्याने उंदरांकडून नुकसान होत आहे. शिवाय व्यापार बंद असल्याने भाव पडत आहेत व यात शेतकºयाचे नुकसान होत आहे. माल पडून असल्याने शेतकºयांना बाजार समितीच्या चकरा माराव्या लागत असल्याचे दिसले.
बाजार समितीचे नव्या यार्डात स्थानांतरण झाले आहे. त्यामुळे व्यापार नव्या यार्डात सुरू असून जुन्या यार्डात व्यापार केला जाणार नाही.
सुरेश जोशी
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, गोंदिया