प्रसाधनगृहाअभावी व्यापाऱ्यांची कुचंबणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:52+5:302021-06-09T04:36:52+5:30
भटक्या समाजाची समस्या संपता संपेना आमगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या म्हणीप्रमाणे लोहार ...
भटक्या समाजाची समस्या संपता संपेना
आमगाव : पोटाची खळगी भरण्यासाठी ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ या म्हणीप्रमाणे लोहार समाज भटकंती करून आपल्या संसाराचा गाडा हाकत आहे. यासाठी गावोगावी फिरून मिळालेल्या पैशातून ते आपला उदरनिर्वाह करतात.
घरकूल अनुदान पद्धतीत बदल करा
गोरेगाव : बेघर कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते, परंतु अनुदान देण्याची जाचक अट असल्यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी होते. कित्येकांना अनुदान मिळण्यास उशीर होतो. यामुळे लाभार्थी कर्जबाजारी होतो. अनुदान देण्याच्या पद्धतीत बदल करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
बस स्थानक ठरत आहे शोभेची वास्तू
गोरेगाव : शहरात १०-१२ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली. या बस स्थानकावर आजघडीला कुणीही कर्मचारी राहत नाही, तसेच गोरेगावमार्गे जाणाऱ्या बस या बस स्थानकावर थांबत नाहीत. त्यामुळे बस स्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेला प्रवासी निवारा शोभेची वास्तू ठरत आहे.
ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांची दुरवस्था
तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले, परंतु यापैकी अनेक रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा या रस्त्यांच्या दुरुस्तीची पुन्हा गरज असून, तशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नेटवर्कअभावी नागरिक झाले त्रस्त
देवरी : विविध शासकीय कार्यालयातील कामकाजांसह खासगी कंपनी कार्यालयातील कामे ऑनलाइन सुरू आहेत. त्यामुळे मोबाइलचा वापरही वाढला आहे. मात्र, आता नेटवर्कअभावी नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या गत आठ ते दहा वर्षांपासूनची आहे. दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
कार्यालयातून तक्रारपेट्या गायब
आमगाव : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्य पद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. या हेतूने शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र, आता कार्यालयातून या तक्रारपेट्या गायब झाल्याचे दिसतात.
दिवसाही सुरू असतात पथदिवे
गोंदिया : जिल्हास्थळ असलेल्या गोंदिया शहरात नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे भरदिवसाही पथदिवे सुरू असतात. त्यामुळे नगरपरिषदेला नाहकच अधिकच्या विजेचा भुर्दंड सोसावा लागतो.
बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
तिरोडा : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना फटका बसत आहे.
चांदोरी खुर्द रस्ता अपघाताला आमंत्रण
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील पिपरिया चांदोरी खुर्द-खैरलांजी पिपरिया रस्ता खराब झाल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
तंटामुक्त गाव अभियान नावापुरतेच
सडक अर्जुनी : राज्य शासनाच्या तंटामुक्त गाव अभियान योजनेला गावागावातील राजकीय गटबाजी आणि अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे ग्रहण लागल्याने, या अभिनव योजनेचा फज्जा उडाला आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
खातिया : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे धोका होऊ शकतो.
अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची लागली वाट
रावणवाडी : गोंदिया तालुक्यातील बनाथर, कासा, तेढवा, जिरूटोला परिसरातील वाळूघाटांचा लिलाव सुरू झाला नाही, तरीही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळूचे ट्रॅक्टर रात्रंदिवस धावत असल्याने गावकुसातील रस्ते उखडले आहेत. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे. गोंदिया तालुक्यातील वाळूघाटांतून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन केले जात आहे. वाळू भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरमुळे कासा, जिरुटोला, कोरणी, बनाथर, तेढवा रस्त्याची स्थिती खराब झाली आहे. विशेष म्हणजे, वाळूमाफियांना महसूल विभागाचे अधिकारी कारवाईसाठी येत असल्याची माहिती सुरुवातीलाच मिळत असते. ते आपल्या जवळची व्यक्ती रावणवाडीपासून घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर तैनात करत असतात. हे व्यक्ती अधिकारी, कर्मचारी येत असल्याची सूचना माफियांना देत असतात. कधी काळी सेटिंग करून कर्मचाऱ्यांना मोकळे करत असतात. परिणामी, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. प्रशासकीय अडचणीमुळे वाळूघाटांचा लिलाव झाला नसल्याचे बोलले जाते. वाळू माफिया गावातील कच्चे रस्ते आणि पांगडी रस्त्यावरून वाळूची वाहतूक करत असल्याने रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. त्यामुळे कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वाळू माफियांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.
निराधारांना मानधनाची प्रतीक्षा
गोरेगाव : कोरोना संसर्गाच्या काळात निराधारांना मानधनाची प्रतीक्षा कायम आहे. गत काही महिन्यांपासून निराधारांना मानधन मिळाले नाही. अनेकांची आज उपासमार होत आहे. बँकेत चौकशी करावी, तर कोरोनामुळे बाहेर निघणेही कठीण आहे, अशा स्थितीत निराधार जीवन जगत आहे.
तिरोड्यात जनावरांचे रस्त्यांवर अतिक्रमण
तिरोडा : तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये रस्त्यावर गावांतील नागरिक जनावरे बांधतात. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होत आहे. नगरपंचायतीने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज असताना दुर्लक्ष होत आहे.
प्रखर दिव्यांमुळे अपघाताची शक्यता
देवरी : दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पुढे हेडलाइट लावले जाते. मात्र, काही तरुण साधे दिवे न लावता, निळ्या रंगाचे, तसेच प्रखर दिवे लावत असल्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा तरुणांवर कारवाई करून अपघाताला आळा घालावा.