शिवाजी चौकात वाहतूक शिपाई नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:29 AM2021-01-20T04:29:38+5:302021-01-20T04:29:38+5:30
केशोरी : येथील छत्रपती शिवाजी चौक, बसस्थानक येथे गावच्या चारही बाजूने रस्ते येत असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असते. रस्त्याला ...
केशोरी : येथील छत्रपती शिवाजी चौक, बसस्थानक येथे गावच्या चारही बाजूने रस्ते येत असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असते. रस्त्याला लागून खासगी व्यापाऱ्यांनी दुकाने थाटल्याने रस्त्यावर वाहने उभी करून ग्राहक दुकानातील साहित्य घेण्यास मग्न असतात. त्याचबरोबर विद्यार्थी-विद्यार्थिनींचा या स्थळी दिवसभर वावर असतो. याचीच दखल घेत या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवाजी चौकातून अतिवेगाने वाहने धावत असल्याने अपघाताची शक्यता नागरिकांनी व्यक्त करीत वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस शिपायाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी लोकमतच्या माध्यमातून नागरिकांनी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन ठाणेदार संदीप इंगळे यांनी शिवाजी चौकातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करून आपल्या कर्तव्य दक्षतेचा परिचर करून दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी हे गाव या परिसरातील गावांचे प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. येथील शिवाजी चौक, बसस्थानक या भागातून सतत वाहतुकीची वर्दळ असते. दिवसभर विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी ये-जा असते. परिवहन महामंडळाच्या बसेसला परतून वळण घेण्यासाठी चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा वाहनचालक वाहने उभी करून दुकानातील साहित्य घेण्यासाठी जातात यामुळे वाहनांची रस्त्यावर गर्दी दिसून येत होती. तरुणांचा वाहने चालविण्याचा वेग जास्त असतो. या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी केली होती.