कामठा चौकातील रस्ता खोदल्याने ‘ट्राफिक जाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:19 AM2021-06-29T04:19:55+5:302021-06-29T04:19:55+5:30
आमगाव : येथील कामठा चौकात रस्ता खोदून ठेवल्याने कामठा मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा ...
आमगाव : येथील कामठा चौकात रस्ता खोदून ठेवल्याने कामठा मार्ग बंद करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरात मुख्य रस्त्यावर सिमेंट काँक्रिट रस्ता तयार करण्यासाठी शासनाकडून शिवालय कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. यासाठी कामठा चौकात रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांना ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागत आहे. चौकातील रस्ता खोदताना वाहतुकीला अडथळा येऊ नये याकरिता काही प्रमाणात रस्ता सोडला जातो. जेणे करुन नागरिकांना ये- जा करता येईल, कामठा मार्गावरून मार्गक्रमण करण्यासाठी हा एकच रस्ता आहे. दुसरा रस्ता पर्याय नसल्याने येथील मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात जाणारे रायपूर, डोंगरगढ, सालेकसा तर लांजी, कारंजा व देवरीकडे जाण्यासाठी प्रवासी तासनतास उभे होते. रस्ता बांधकामात आंबेडकर चौक ते मुख्य रस्त्यावर ५ फुटाचा खड्डा करून खड्ड्यात मुरूम-गिट्टी टाकून पाया मजबूत करण्यात आला. पण कामठा मार्ग ते लांजी मार्गे रस्ता १ फूट खोदून तेथीलच जुन्या रस्त्याचा मलमा दाबून रस्ता तयार करण्यात येत आहे. यामुळे रस्त्याची निकृष्टता चव्हाट्यावर येत आहे. कंपनीच्या खासगी अभियंत्यांना विचारणा केली असता इस्टिमेटमध्ये कमीच खोदण्याचे नमूद असल्याचे सांगितले. पण आतापर्यंत संपूर्ण रस्ता ४ ते ५ फुटाच्या जवळपास का खोदण्यात आला असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नुकतेच झालेल्या आंदोलनाचा वचपा काढण्याचा डाव असल्याची शंका नागरिकांकडून वर्तविली जात आहे.
-----------------------
खोदलेल्या जागेत अपघातांचे सत्र
रस्ता बांधकामाला घेऊन खोदलेल्या जागेतून वाहतूक सुरू असून तेथे दररोज अपघात घडत आहेत. यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, राजकीय पक्ष, संघटना मूग गिळून का आहेत? या रस्त्याचा माय बाप आहेत? काय? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. हा रस्ता निकृष्ट दर्जाचा राहणार तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दर्जेदार रस्त्यासाठी आवाज उठवावा. नियमानुसार काम करावे अन्यथा कंपनी विरोधात गुन्हा नोंदवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजीव फुंडे यांनी पोलीस निरीक्षक व्ही. के. नाळे यांना लेखी तक्रारीतून केली आहे.