वाहतूक व्यवस्थेचे वाजले बारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 08:29 PM2019-04-13T20:29:52+5:302019-04-13T20:31:07+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी सुधारण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने मागील वर्षी काही प्रयोग राबविले. वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आणि वाहनात बसून ट्राफिक कंट्रोल करण्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी सुधारण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने मागील वर्षी काही प्रयोग राबविले. वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने आणि वाहनात बसून ट्राफिक कंट्रोल करण्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहेत. परिणामी शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहन चालक आणि पादचारी नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
हावडा मुंबई मार्गावरील प्रमुख रेल्वे स्थानक आणि विदर्भाची मिनी मुंबई म्हणून ओळखले जाणारे गोंदिया शहर वाहतूक व्यवस्थेसाठी मात्र तितकेच चर्चेत असते. शहरातील अस्थाव्यस्त वाहतुकीमुळे पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागते. यावरुन शहरातील वाहतूक व्यवस्था किती सुरळीत आणि चांगली आहे याची प्रचिती येते.
गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, गांधी प्रतिमा, नेहरु चौक, गंज वॉर्ड भाजीबाजार परिसरात शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. शिवाय याठिकाणी चंद्रपूरपासून ते बालाघाटपर्यंतचे नागरिक विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी येथे दररोज येतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच वर्दळ असते. मात्र शहरातील मुख्य रस्त्यांवर आधीच व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ते अरुंद झाले आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने ये-जा करण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नाही. त्यामुळे अनेकदा या परिसरात वाहतुकीची कोंडी होती. त्याचा मनस्ताप शहरवासीय आणि वाहन चालकांना सहन करावा लागतो. वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर नागरिकांचा गदरोळ उडतो तेव्हा दूरवर उभे असलेले वाहतूक पोलीस वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोहचतात.
मात्र तोपर्यंत रस्त्याच्या कडेला उभे राहून हा सर्व प्रकार पाहत असतात. आता तर वाहतूक नियंत्रण विभागाने नवीनच प्रयोग सुरू केला.
शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी वाहनात बसून ट्राफीक कंट्रोल करण्यास सुरूवात केली. वाहनात बसून ट्राफीक कंट्रोल करणाऱ्यांना रस्त्यावरुन चालणाºया पादचारी नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा किती त्रास होतो हे कसे कळणार हा सुध्दा विचार करणार प्रश्न आहे.अनेकांनी यावर विनोद देखील केला.एकंदरीत शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहे.
वन वे पार्किंगचा प्रयोग फसला
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागाने नागपूरच्या धर्तीवर वन वे पार्किंगचा प्रयोग राबविला होता. मात्र यात देखील सातत्याने ठेवण्यात वाहतूक नियंत्रण विभागाला अपयश आले. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत वन वे पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जाणाºया वाहनाची स्थिती पाहता हे फलक केवळ नावापुरतेच ठरत आहे.
वाहतूक पथदिवे बंद
वाहतूक नियंत्रण विभागाने बऱ्याच वर्षांनंतर शहरातील वाहतूक पथदिवे सुरू केले होते. मात्र त्यांच्या देखभाल दुरूस्ती प्रश्न निर्माण झाल्याने वाहतूक पथदिवे सुध्दा बंद पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे.
पोलीस अधीक्षक दखल घेणार का?
शहरातील विस्कळीत वाहतुकीची घडी सुधारण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दखल घेवून सुधारणा करतील का असा सवाल शहरवासीयांकडून केला जात आहे. त्यामुळे वाहतूक नियंत्रण विभाग यावर काय तोडगा काढतो याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.