रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालाला अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:45 AM2021-02-23T04:45:48+5:302021-02-23T04:45:48+5:30
गोंदिया : रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार करून त्याची प्रवाशांना विक्री करणाऱ्या शहरातील पुनाटोली येथील एका दलालास रेल्वे सुरक्षा बल क्राईम ...
गोंदिया : रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार करून त्याची प्रवाशांना विक्री करणाऱ्या शहरातील पुनाटोली येथील एका दलालास रेल्वे सुरक्षा बल क्राईम ब्रँच पथकाने सोमवारी (दि. २२) रंगेहात अटक केली. समीर ऊर्फ सुरेश येसनसुरे असे रेल्वे ई-तिकिटांची विक्री करणाऱ्या दलालाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार रेल्वे सुरक्षा बल क्राईम ब्रँचच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गोंदिया शहरातील पुनाटोली परिसरात एक ई-तिकीट तयार करून देणारा दलाल कार्यरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर क्राईम ब्रँचचे सहायक उपनिरीक्षक एस. एस. ढोके, आर. सी. कटरे, आरक्षक एस. बी. मेश्राम यांनी पुनाटोली येथे धाड टाकून वेगवेगळ्या चार पर्सनल आयडीवरून रेल्वे आरक्षित ई-तिकीट तयार करून देणाऱ्या सुरेश येसनसुरे याला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून एक विवो कंपनीचा मोबाईल, २४ ई-तिकीट आदी साहित्य जप्त केले. तो आईआरसीटीचा अधिकृत एजंट नसून स्वत:च्या नावाने तयार केलेल्या बनावट आयडीच्या माध्यमातून तो ई-तिकीट तयार करून देत होता. यासाठी तो ग्राहकांकडून ५० ते १०० रुपये प्रतितिकीट अतिरिक्त घेत होता. याप्रकरणी त्याच्यावर रेल्वे अधिनियम १४३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याला पुढील कारवाईसाठी गोंदिया रेल्वे सुरक्षा बलाच्या स्वाधीन करण्यात आले.