सेंद्रिय शेतीसंबंधी शेतकऱ्यांना प्रशिक्षण
By admin | Published: June 29, 2016 01:47 AM2016-06-29T01:47:31+5:302016-06-29T01:47:31+5:30
तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्या वतीने परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत निवड झालेल्या
बोंडगावदेवी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगावच्या वतीने परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत निवड झालेल्या ५० शेतकऱ्यांची कार्यशाळा महागाव-सिरोली येथे समाजमंदिरात घेण्यात आली.
मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषी अधिकारी एन.एच. मुनेश्वर, कृषी पर्यवेक्षक एम.बी. ठाकूर, व्ही.एच. कोहाडे, एन.एन. बोरकर उपस्थित होते. मार्गदर्शनात मुनेश्वर म्हणाले, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादीत शेतमालाला प्रचंड मागणी असल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळतो. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शेततळे, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अभियांत्रीकीकरण योजना, राष्ट्रीय फलोत्पादन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी कार्यालयाशी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
कृषी पर्यवेक्षक ठाकूर म्हणाले, सेंद्रिय शेतीकरिता जनावरांचे फार महत्व आहे. गोमूत्र व शेणापासून कुजलेले शेणखत तयार करता येते. जिवामृत, बिजामृत, दशपर्णी अर्क यापासून जमिनीची सुपिकता वाढविता येते, असे त्यांनी सांगितले. व्ही.एच. कोहाडे यांनी सेंद्रीय शेतीबाबत, दिवसेंदिवस रासायनिक खताचा वापर केल्याने उत्पादन खर्च वाढतो. सेंद्रीय शेती केल्याने अवाजवी खर्चावर आळा बसून उत्पादीत मालास बाजारपेठ उपलब्ध होत असल्याचे सांगून शेतकऱ्यांना सदर प्रकल्पाची माहिती दिली. संचालन एन.एन. बोरकर यांनी केले. चचाणे यांनी आभार मानले. कार्यशाळेला शेतकरी गटातील ५० शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)