हड्डीटोली येथे मालधक्का स्थलांतरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 08:48 PM2018-01-07T20:48:23+5:302018-01-07T20:48:40+5:30
शहरातील रेलटोली येथील मालधक्का हड्डीटोली येथे स्थांनातरीत करा, रेल्वे स्थानकावरील समस्या मार्गी लावण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दक्षिण पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सोईन यांना दिलेल्या निवेदनातून केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील रेलटोली येथील मालधक्का हड्डीटोली येथे स्थांनातरीत करा, रेल्वे स्थानकावरील समस्या मार्गी लावण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दक्षिण पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सोईन यांना दिलेल्या निवेदनातून केली. रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यांवर चर्चा केली.
महाव्यवस्थापक सोईन यांनी शिष्टमंडळाच्या मागण्या ऐकूण घेऊन त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. रेलटोली येथील मालधक्का वाढत्या शहरीकरणामुळे आता शहराच्या मध्यभागी आला आहे. रहिवासी क्षेत्रात अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
गुड्स शेडला गोंदिया शहरातीलच हड्डीटोली येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे आधीपासूनच विचाराधिन आहे. आता प्रस्तावित हड्डीटोली गुड्स शेडपर्यंत पोहोचण्यासाठी बायपास मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी गुड्सशेड स्थलांतरित झाले तर अवजड वाहने शहराच्या बाहेर बायपास मार्गावरून निघू शकतील व नागरिकांना सुविधा होईल. असे अपूर्व अग्रवाल यांनी सोईन यांना सांगितले. निवेदनातून गोंदिया शहरात कटंगी लाईनवर राणी सती लॉज समोरून रेल्वे आरक्षण कार्यालयापर्यंत पादचारी पुलाच्या बांधकामाची मागणी करण्यात आली. अंडरग्राऊंडजवळ रेल्वेच्या जमिनीवर वसलेल्या सतनामी मोहल्ल्याबाबत सांगण्यात आले की, ही जमीन रेल्वे विभागासाठी उपयोगाची नाही.
या जमिनीवर समाजाचा मागील अनेक दशकांपासून ताबा आहे. अतिक्रमणाला नियमित करण्यासाठी संबंधित जमीन राज्य शासनाला हस्तांतरित करण्याची मागणी केली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अंडरग्राऊंड मार्गावर लाईट, पेंटिंग व दुरूस्तीबाबत मागणी केली. रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूकडे वसलेल्या शहरास आपसात जोडण्यासाठी रेल्वे विभागाद्वारे अंडरग्राऊंड मार्गाचे बांधकाम अनेक दशकांपूर्वी करण्यात आले होते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल व घाण असते.
स्ट्रीट लाईटच्या अभावाने कधीकधी गुन्हेगारीच्या घटनाही घडतात. त्यामुळे सदर मार्ग अनुपयोगी ठरत आहे. शिष्टमंडळात काँग्रेस महासचिव व गोंदिया स्थानक सल्लागार समितीचे सदस्य अपूर्व अग्रवाल, मंडल रेल्वे व्यवस्थापक अमित अग्रवाल, वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिब्बल, रेल्वे समितीचे माजी सदस्य रमन मेठी, नगरसेवक व्यंकट पाथरू, सुनील तिवारी, सुशील रहांगडाले, कमल छपरिया, मनोज पटनायक, राजू लिमये, दिलीप गुप्ता, बलजीतसिंह बग्गा, गिरीश तांडेकर, ड्रामाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, आरपीएफ निरीक्षक भोलानाथसिंह, जीआरपी निरीक्षक ज्ञानेश्वर नालट यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व सदस्य उपस्थित होते.