मामा तलावाचे लाभाधिकार जि.प.गोंदियाकडे हस्तांतरित
By Admin | Published: March 10, 2017 12:38 AM2017-03-10T00:38:31+5:302017-03-10T00:38:31+5:30
तालुक्यातील सेलोटपार गट ग्रामपंचायतमधील खैरी येथील ११ हेक्टर जमिनीवरील मामा तलावाची मालकी भंडारा
खैरी येथील तलाव : भंडारा सीईओचे गोंदिया सीईओ यांना पत्र
तिरोडा : तालुक्यातील सेलोटपार गट ग्रामपंचायतमधील खैरी येथील ११ हेक्टर जमिनीवरील मामा तलावाची मालकी भंडारा जिल्हा परिषदेकडे होती. जिल्हा वेगळा होवून १७ वर्षे पूर्ण होवूनही तलावाचे विविध लाभ जि.प. भंडारा घेत होते. याबाबत जि.प. सदस्य रजनी मिलिंद कुंभरे यांनी स्थायी समिती जिल्हा परिषद गोंदिया येथे हा मुद्दा उचलून धरला. वारंवार पाठपुरावा करण्याची आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले व त्या मामा तलावाचे लाभाधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया यांंना दिल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा यांनी दिले.
भंडारा व गोंदिया जिल्हा १ मे १९९९ मध्ये वेगळे झाले. नियमानुसार ज्या-ज्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात येणारी शासकीय मालमत्ता त्या-त्या जिल्हा परिषदेला देणे गरजेचे होते. परंतु खैरी येथील मामा तलाव ११ हेक्टर जमिनीवर पसरलेला असून त्यावर आतापर्यंत भंडारा जिल्हा परिषदेची मालकी होती. त्या तलावाचे लिलाव भंडारा जि.प. करीत होते. त्याचे सर्व आर्थिक लाभाधिकार भंडारा जिल्हा परिषदेकडे होते. ही गंभीर बाब यापूर्वी अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्या निदर्शनास कशी आली नाही, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो.
पण जि.प. सदस्य रजनी कुंभरे यांच्या नजरेतून सुटू शकली नाही. त्यांनी जिल्हा परिषद गोंदियाच्या स्थायी समितीत ही गंभीर बाब उचलून धरली व सतत पाठपुरावा करण्यास आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले व हे मामा तलाव जि.प. भंडाराकडून पत्र (भंजिप/लपा/ता-१/२१४/२०१७, कार्यालय लघू सिंचन विभाग, जि.प. भंडारा, दि.२/२/२०१७) अन्वये हस्तांतरित करून आर्थिक लाभाचे सर्व अधिकार जिल्हा परिषद गोंदियाला देण्यात आले. जिल्हा परिषद गोंदियाच्या मालमता नोंदवहीमध्ये सदर मामा तलावाची नोंद करावे व याप्रमाणे पुढील सर्व कार्यवाही करण्याची नोंद सदर पत्रामध्ये नमूद केली आहे.
जिल्हा परिषद सदस्य रजनी कुंभरे यांच्या प्रयत्नांना यश आल्याने जि.प. गोंदियाचे उत्पन्न वाढेल. स्थानिक युवकांना, नागरिकांना रोजगार मिळेल, असे त्यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)